
जालना: जळगाव जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर राज्यात पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जालना जिल्ह्यातील सारवाडी येथे नांदेड-तपोवन एक्सप्रेस समोर चक्क रेल्वे ट्रॅकवर ट्रक उभा करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ट्रक आडवा लावल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. सुदैवाने, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला
मुंबईवरून नांदेडकडे जाणाऱ्या नांदेड-तपोवन एक्सप्रेस समोर हा ट्रक आडवा लावण्यात आला होता. मात्र, लोको पायलटने प्रसंगावधान राखत वेळीच ब्रेक लावले आणि ट्रेन थांबवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.
ट्रकचालक फरार, पोलीस तपास सुरू
स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेल्वे ट्रॅकवर आडवा असलेला ट्रक बाजूला करण्यात आला, त्यानंतर तपोवन एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत ट्रकच्या मालकाचा आणि चालकाचा शोध सुरू केला आहे. ट्रक चालकाने असा प्रकार का केला, हा अपघात होता की जाणूनबुजून केलेली कृती, याचा तपास सुरू आहे.
जळगाव रेल्वे अपघातानंतर पुन्हा सुरक्षेचा प्रश्न
गेल्या काही दिवसांपूर्वीच जळगाव जिल्ह्यात मोठा रेल्वे अपघात झाला होता, ज्यात 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशा परिस्थितीत जालना जिल्ह्यातील नवीन घटना अधिक चिंताजनक ठरत आहे.
रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे.