
संपूर्ण जगातील मानव जातीच्या हिताचा विचार आणि त्याच विचारांवर अखंड आचरण करणारी शुध्द अंत:करणाची माणसे जगाच्या पटलावर फारच थोडी असतात. त्यांचं जगाच्या कल्याणासाठीचं कार्य हे कोणत्याच मर्यादेत न अडकता नेहमीच परिवर्तनशील प्रेरणास्रोत ठरणारे असते. हिच माणसं अखंड मानवता आणि मानवी एकोप्याचा आयाम घडवतात. हे विश्वची माझे घर ते आता विश्वात्मके व्हावे या जगण्याच्या भूमिकेतून झालेला त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा सहज सोपा कधीच नसतो. खूप भोगावं लागत, सोशिक होऊन जगावं लागतं, तेव्हा कुठतरी कार्यप्राप्ती पूर्णत्वास जात असते. तरीदेखील अशाच मार्गावर मार्गस्थ झालेला सध्याच्या शतकातील विश्वशांतीचा एक शांतीदूत म्हणजेच विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड होय..! प्रवास फार चित्तवेधक..रोमांचक आणि अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या युवकांना आदर्शवादीच..!!
जेमतेम १५०० लोकसंख्या असलेल्या रुई – रामेश्वर या एका छोट्याश्या खेड्यातील वारकरी घराण्यात डॉ. विश्वनाथ कराड यांचा जन्म झाला. वडील दादाराव कराड हे वारकरी असल्याने भारतीत संत परंपरेचे संस्कार आणि जीवन मूल्यांचे बाळकडू त्यांना बालवयात मिळाले. शांत, संयमी बाणा आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी लहानपणापासूनच शिक्षणात यशश्री संपादन केली. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरींग चे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ते त्याच महाविद्यालयात विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून कार्यरत होते. कालांतराने वसंतदादा पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९८३ मध्ये त्यांनी पुण्यातच माईर्स एम.आय. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातूनच काहीतरी चांगले निर्माण करता येईल, या विचारांनी त्यांनी मग शिक्षणाच्या विविध शाखा सुरू केल्या. विज्ञानाबरोबरच मूल्याधिष्ठित संस्कार आणि संताचा मानवतेचा विचार हा येणाऱ्या नवीन पिढ्यांमध्ये रुजावा आणि दंगलींच्या युध्दखोर जमान्यात विश्वशांती नांदावी यासाठी काहीतरी करावे, ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यातूनच पुढे त्यांनी आळंदी येथे विश्वशांती केंद्राची स्थापना केली. डॉ. वि. दा. कराड सरांच्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. विवेकानंदांनी सांगितलेल्या विश्वबंधुत्व आणि विश्वमानवते सोबतच सध्याच्या काळात विश्वशांती किती महत्त्वाची आहे, हे ओळखूनच त्यांनी विश्वशांतीसाठी अखंड काम करायचे ठरवले. यासाठी सर्व धर्मातील चांगुलपण या समाजाच्या पुढे आणून सांप्रदायिक सदभाव निर्माण करणे महत्त्वाचे होते. हा सांप्रदायिक सद्भाव निर्माण व्हावा, यासाठी विश्वशांती केंद्राच्या वतीने त्यांनी आजपर्यंत अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कृती कार्यक्रम राबवले आहेत. स्वतःच्या रुई या जन्मगावी मानवतातीर्थ बांधून त्यांनी हा वसा अधिकच जोरात चालू ठेवला. फक्त आपल्या भारत देशातील नव्हे तर जगातीलच सर्व युद्धे,भांडणे, तंटे संपुष्टात येऊन हा मानवी समाज केवळ मानवतेने जोडला गेला पाहिजे आणि याच्यातून अविरतपणे विश्वसमृद्धी बरोबर विश्वशांती एकमेकांच्या सोबतीन नांदत राहिली पाहिजे, हाच यामागील प्रांजळ हेतू. तोही जगाच्या कल्याणाचा. केवळ निस्वार्थाचा..!!
जगातील सांप्रदायिक सद्भाव जोपासला जावा यासाठी त्यांनी स्वतःपासूनच कार्य आरंभले. यातूनच रुई रामेश्वर येथे बुद्धविहार, विश्वधर्मी श्री राम रहीम मानवता सेतू, मानवता तीर्थ यांची निर्मिती करण्यात आली. ईश्वर एकच आहे. आपण सर्वजण त्याची अपत्ये आहोत. त्यामुळे सर्वजण एकमेकांचे भाई बंधू आहोत. विविध रंगांच्या झेंड्यांना महत्व नाही. आपण मिळून मिसळून राहणे आणि बंधुत्वाने प्रेम वाटणे. हाच खरा धर्म आहे. मानवता जोडणारा हा सेतू, राम रहीम चे बंधुत्व आणि विश्वप्रेम जोडणारा सेतू ही श्री स्वामी विवेकानंदांची कल्पना आज कराड सरांच्या मुळेच पूर्णत्वास आली आहे.
आज कराड सरांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी शिक्षण संस्थेचा कार्य विस्तार झपाट्याने वाढला आहे. यातूनच २०१७ साली एमआयटी विश्वशांती विद्यापीठाबरोबर एमआयटी च्या चार नवीन विद्यापीठांना मान्यता मिळाली आहे. या विद्यापीठांत विश्वशांती आणि भारतीय परंपरा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी नानाविध कोर्सेस शिकवले जातात. विश्वशांती केंद्र, माईर्स एम्आयटी, पुणे या संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सर्व जगभर विश्वशांती संस्कृती जपण्याचा हेतू उराशी बाळगून आणि विशेषता भारतीय परंपरा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी तद्वतच अखिल मानव जातीचा उत्कर्ष आणि कल्याणाच्या उद्देशाने ‘मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धती’च्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत. आणि म्हणूनच “मानवाधिकार, लोकशाही, शांतता व सहिष्णुता”साठीचे युनेस्को अध्यासन संस्थेला युनेस्को पॅरिस तर्फे बहाल करण्यात आले आहे. अर्थातच जगालासुद्धा डॉ. कराड सरांच्या कार्याची दखल घेणे भाग पडले आहे.
विश्वशांतीचा समृद्ध विचार घराघरात पोहोचला पाहिजे, तो आचरणात आला पाहिजे आणि तो आचरणात येण्यासाठी भारतीय संत साहित्य संस्कृती जोपासली पाहिजे म्हणून ते आजही कार्यरत आहेत. विश्वबंधुत्व, विश्व मानवता, विश्वशांती यांचा विचार संतांच्या साहित्यातून, संतांच्या शिकवणी मधून येतो. आणि म्हणूनच संत साहित्य, संत संस्कृती टिकली पाहिजे. मानवतावादी मूल्यांची पाळमूळ असणारी संत साहित्य संस्कृती जोपासण्यासाठी कराड सरांनी व्यापक स्तरावर कार्य केले आहे. भारतीय समाजामध्ये संतविचार आणि संत साहित्याच्या संदर्भात चर्चा व्हावी, समाजाच्या पटलावर विषय प्रवेश व्हावा. आणि भारतीय संत साहित्यातील तत्त्वज्ञान, विज्ञान, जगाला ज्ञात व्हावे. ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, व्यवहार ज्ञान, प्रपंच ज्ञान या सर्व दृष्टिकोनातून संत साहित्याचा महिमा समाजमनात रुजवणे आणि संत साहित्याचा विचार व आचरण मूल्यवर्धित शिक्षण प्रणालीमध्ये यावे. यासाठी गेल्या चार दशकांपासून डॉ. कराड सर उच्चशिक्षण आणि संत विचारांची सांगड घालत असतानाच त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या मध्यभागी संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती स्थापन करून जगाला विश्वात्मक पसायदानाचा आदर्श दिला आहे.
विज्ञान, आध्यात्मातून विश्वशांती जोपासत असताना विश्वशांती चे प्रतीक म्हणून कराड सरांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेला लोणी काळभोर कॅम्पस स्थित जगातील सर्वात मोठा घुमट आज या सर्वांची साक्ष देतो. विश्वशांतीचा आणि कल्याणाचा वसा घेतलेल्या कराड सरांच्याच वाटेने आपल्या सर्वांना आता जावे लागेल. ग्लोबल व्हिलेज ची संकल्पना मांडणाऱ्या पाश्चिमात्यांना आपल्याला आता ठणकावून सांगावे लागेल की, विश्वमानवतेचा झंकार, विश्वबंधुत्वाचे बीज आणि विश्वशांतीचा वारसा हा मूळ भारतीय संस्कृतीचाच आहे. आणि म्हणूनच आपल्या देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी विश्वशांतीचा ध्येयवाद घेतलेल्या विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड या सूर्यासम तेजस्वी युगपुरूषाच्या समर्थ नेतृत्वामध्ये सकल भारतवर्ष हा वारसा अत्यंत निष्ठेने अंगिकारत आहे. आणि या महायज्ञाचा पाईक असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
– विक्रम आप्पासो शिंदे
जनसंपर्क विभाग,
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे.