
पुणे: पुणे जिल्ह्यातील उगलेवाडी व फदालेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना आदिवासी सेवक पुरस्कार विजेत्या सीताबाई किरवे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम त्यांच्या मातोश्री कोंडाबाई भोईर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानिमित्ताने उपस्थित ग्रामस्थांनी सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
समाजसेवेची वेगळी वाटचाल
सीताबाई किरवे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून मला समाजासाठी नेहमीच काहीतरी करण्याची इच्छा असते. म्हणून मी वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन आणि आदिवासी भागातील महिलांना साडी वाटप करून साजरा करण्याचा निर्णय घेतला. ज्या समाजात मी जन्म घेतला, त्या समाजाच्या संस्कृतीचा मला अभिमान आहे.”
कार्यक्रमाला विविध कार्यकारी समितीचे माजी चेअरमन बजरंग उगले, जिल्हा परिषद माजी सदस्या जनाबाई उगले, लोकनेते सरपंच विनोद उगले, सुनंदा करवंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शंकर असवले, मुख्याध्यापक जनार्दन चौधरी, वैशाली पंदारे, काळू असवले व उज्वला वारे यांनी केले. सूत्रसंचालन मच्छिंद्रनाथ झांजरे यांनी केले.
महिला सक्षमीकरणासाठी किरवे यांचे भरीव योगदान
सीताबाई किरवे यांनी संपूर्ण देशभर बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित केले.
सीताबाई किरवे यांच्या समाजसेवेच्या या अनोख्या उपक्रमामुळे त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.