
पुणे: राष्ट्रीय शिक्षण मंडळाचा १०१ वा वर्धापन दिन समारंभ दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी टिळक आयुर्वेद महाविद्यालयात संपन्न झाला. समारंभाचे प्रमुख अतिथि माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड होते. काळाच्या कसोटीवर उतरलेले व डॉक्युमेंटेड असे आयुर्वेद शास्त्र आहे व इंटिग्रेटेड हेल्थ केअर हे आरोग्य क्षेत्राचे भवितव्य आहे, मनुष्याच्या शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी आयुर्वेद हे शास्त्र उपयुक्त आहे असे उद्गार डॉ. चंद्रचूड यांनी काढले.
या समारंभात आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते. त्यांनी आयुष मंत्रालयाच्या आयुर्वेदाच्या वाढीसाठीच्या विविध योजनांची, आयुष व्हीसा, आयुष विमा या सारख्या योजना सरकार पातळीवर राबवून आयुर्वेदाला सामाजिक स्थान प्राप्त होत असल्याची माहिती दिली. समारंभाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पुराणिक यांनी राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या नऊ घटक संस्थांची माहिती दिली व सर्वोच्च न्यायालयात डॉ. चंद्रचूड यांनी पुढाकार घेऊन आयुर्वेदाचे होलिस्टिक सेंटर सुरु केल्या बद्दल आयुर्वेदाला सर्वोच्च न्याय मिळाल्याचे सांगितले. या समारंभात जामनगर आयुर्वेद संशोधन केंद्राच्या संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. तनुजा नेसरी यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सचिव डॉ. राजेंद्र हुपरीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. या कार्यक्रमात प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्य अनंत धर्माधिकारी यांना जीवन गौरवपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या स्वस्थवृत्त, द्रव्यगुण, भैषज्य कल्पना व रोग निदान विभागांनी ‘आहार हेच औषध’ या विषयावरील प्रदर्शन भरविले होते. संस्थापक कै. वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल यांच्या स्मरणार्थ आयोजित विविध पोस्टर, निबंध, विषय सादरीकरण, रुग्ण व प्रकृती परीक्षण, उत्स्फूर्त वक्तृत्व या आंतरवैद्यकीय राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांचे बक्षीस वितरण झाले. कार्यक्रमात आयुर्विद्या इंटरनॅशनल या शास्त्रीय जर्नलचे प्रकाशन झाले.
समारंभाचे आभार प्रदर्शन डॉ. भालचंद्र भागवत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मिहीर हजरनवीस, डॉ. विनया दीक्षित, डॉ. अपूर्वा संगोराम यांनी केले. कै. पु.ग. नानल राष्ट्रीय स्तरावरील आंतरवैद्यकीय पोस्टर, विषय सादरीकरण, निबंध इ. स्पर्धांचे संयोजन डॉ. मंजिरी देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. विजय डोईफोडे, डॉ. मधुकर सातपुते, डॉ. भालचंद्र धडफळे, अॅड. श्रीकांत पाटील, नानल रुग्णालयाचे उपधिक्षक डॉ. प्रमोद दीवाण व अन्य घटक संस्थांचे पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.