
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विमोचक (फायरमन रिस्क्युअर) सरळ सेवा भरती प्रक्रियेत पात्रतेच्या निकषांवरून उमेदवारांमध्ये नाराजी आहे. उमेदवारांनी आयुक्तांना निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महानगरपालिकेने २५ मार्च २०२४ रोजी जाहिरात क्रमांक ६७०/२०२४ अंतर्गत १५० जागांसाठी भरती जाहीर केली होती. लेखी परीक्षा २९ ऑगस्ट २०२४ रोजी झाली, तर मैदानी चाचणी २२ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान पार पडली. अंतिम निवड यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, या भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य अग्निशामन प्रशिक्षण केंद्र, मुंबई येथे १६ महिन्यांचा अग्निशामक प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे अनिवार्य होते. मात्र, काही उप-अग्निशमन अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनीही या भरतीसाठी अर्ज करून परीक्षा दिली आणि मैदानी चाचणीही पूर्ण केली आहे. त्यामुळे मूळ अग्निशामक विमोचक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांवर अन्याय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“२०१६ च्या भरतीप्रमाणे नियम पाळावेत”
उमेदवारांनी असेही नमूद केले की, २०१६ मध्ये झालेल्या भरतीत उप-अग्निशमन अधिकारी प्रशिक्षण घेतलेल्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे यंदाही नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“आम्ही सर्व अग्निशामक विमोचक उमेदवार ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील असून खूप अपेक्षेने या भरतीकडे पाहत आहोत. जर या भरती प्रक्रियेत उप-अग्निशमन अधिकारी प्रशिक्षण घेतलेल्यांना संधी दिली, तर आमच्या संधींवर गदा येईल. त्यामुळे 06 महिन्यांचा अधिकृत प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांनाच संधी द्यावी,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा
या संदर्भात मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, नगर विकास विभाग सचिव, अग्निशामक सेवा संचालनालय, तसेच महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडेही निवेदन पाठवण्यात आले आहे.
उमेदवारांनी भरती प्रक्रियेत न्याय्य निर्णय घेण्याची मागणी केली असून, प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.