
सोलापूर: बार्शी तालुक्यातील वैराग येथे एका पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश ज्योतीराम पाडुळे असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून ते सोलापूर ग्रामीण मुख्यालयात कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश पाडुळे हे ड्युटी संपवून घरी परतले, त्यानंतर त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने पोलीस प्रशासनात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच झाली होती बदली
महेश पाडुळे हे मूळचे माढा तालुक्यातील अंजनगावचे रहिवासी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली वैराग येथे झाली होती आणि ते कुटुंबासोबत तिथे वास्तव्यास आले होते. त्यांच्या अचानक आत्महत्येच्या घटनेने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. महेश पाडुळे काही तणावात होते का? की त्यांच्या आत्महत्येमागे काही वेगळे कारण आहे? याबाबत लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.