
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ सेवानिवृत्त सेवक संघटनेतर्फे “वर्धापन दिन” तसेच “स्नेह मेळावा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट, डेक्कन येथे आयोजित करण्यात आला होता.
संध्याकाळी ४ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला अनेक सेवानिवृत्त सेवक आणि शिक्षक उपस्थित होते. रांगोळ्या व सनई-चौघड्यांच्या मंगलमय वातावरणात ज्येष्ठ सदस्य श्री. प्रकाश पाठक यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव ढमढेरे आणि पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत गायनाने झाली. उपाध्यक्ष श्री. मोहन आवटी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर दिवंगत सेवानिवृत्त सेवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. खजिनदार श्री. मुकुंद पोळ यांच्या प्रास्ताविकानंतर वयाची ७५, ८०, ८५ आणि ९० वर्षे पूर्ण केलेल्या सेवकांचा “वय वंदना सत्कार” करण्यात आला.
या प्रसंगी, विभाग प्रमुख डॉ. तांबट यांच्या सहकार्यामुळे दरवर्षी हा सोहळा उत्तम पार पडतो, याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सहावा वेतन आयोगातील फरकाच्या विलंबामुळे त्यावर व्याज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्याध्यक्ष श्री. राजाभाऊ नेर्लेकर, सचिव श्री. विश्वासराव, सहसचिव श्री. बाळासाहेब हेंदरे आणि त्यांच्या टीमचाही गौरव करण्यात आला.
संघटनेचे वार्षिक अहवाल सादर करताना कार्याध्यक्ष श्री. राजाभाऊ नेर्लेकर यांनी शासनाच्या सुधारित नियमांनुसार २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना एक वेतनवाढ आणि पेन्शन लाभ मिळवून देण्यात यश आल्याचे सांगितले. विशेषतः सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या विलंबाने मिळालेल्या रकमेवर व्याज मिळवण्यासाठी १० वर्षे सातत्याने प्रयत्न करण्यात आले, आणि अखेर हा लाभ सर्व सेवानिवृत्त सेवकांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
कार्यक्रमात माजी सिनेट सदस्य आणि माजी अध्यक्ष एड. श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी, ज्येष्ठ सदस्या सौ. उज्ज्वला कवठेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच श्रीमती अंजली जोशी यांनी अभिजात मराठी वर्षानिमित्त विविध मराठी भावगीते सादर केली. उपस्थितांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोहन आवटी यांनी केले, तर सचिव श्री. विश्वासराव यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्नेहभोजन आणि आपसातील संवादाने कार्यक्रमाची सांगता झाली. पुढील वर्षी पुन्हा भेटण्याच्या निर्धाराने सर्वांनी निरोप घेतला.