
रायगड: खोपोलीसह संपूर्ण खालापूर तालुक्यातील युवकांना कराटे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्याचे कार्य आंतरराष्ट्रीय खेळाडू कॅप्टन भारत भूषण शितल गायकवाड अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र, शतोकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनसाठी स्वतंत्र इमारतीच्या अभावामुळे प्रशिक्षणाला मोठ्या अडचणी येत आहेत. याच प्रश्नावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी कला, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तामामा भरणे यांची थेट भेट घेतली. या बैठकीत शितल गायकवाड यांच्या कराटे असोसिएशनसाठी मंजूर निधी असूनही इमारतीचे काम रखडल्याचा मुद्दा उचलून धरण्यात आला.
कॅप्टन शितल गायकवाड यांनी शतोकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या इमारतीसाठी अनेक वर्षे पाठपुरावा केला आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी भारत भूषण अवॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, राजमाता जिजाऊ पुरस्कार, दादासाहेब फाळके अवॉर्ड, आंतरराष्ट्रीय हेल्थ केअर अवॉर्ड यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली आणि खालापूर परिसरात अनेक युवकांना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटेपटू म्हणून घडवले आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी एक स्वतंत्र कराटे संकुल उभारण्याचा संकल्प केला आहे. खोपोलीतील शतोकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनसाठी कर्जत-खालापूर विधानसभा आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांनी निधी मंजूर केला होता. मात्र, नगरपरिषदेकडून कार्यवाही न झाल्याने अद्यापही ही इमारत उभी राहिलेली नाही. सध्या काम अर्धवट स्थितीत असून, लवकरच नगर परिषद प्रशासनाने पुढील प्रक्रिया गतीने राबवावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. आरपीआय श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार कांबळे यांनी क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. “ही केवळ एक इमारत नाही, तर भविष्यातील हजारो खेळाडूंचे स्वप्न आहे. शितल गायकवाड यांनी अनेक पदक विजेते घडवले आहेत, त्यांना योग्य सुविधा मिळायलाच हव्यात!” अशी ठाम भूमिका तुषार कांबळे यांनी घेतली. या महत्त्वाच्या बैठकीसाठी कॅप्टन शितल गायकवाड, कृष्णाई महाडिक, तुषार कांबळे यांचे सहकारी राहुल मंगळे यांचीही उपस्थिती होती. तुषार कांबळे यांच्या या संघर्षानंतर क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांनी या प्रकरणाची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, खोपोलीतील खेळाडूंना कधी न्याय मिळतो, नगरपरिषदेची पुढील भूमिका काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ! तर, खोपोलीच्या कराटेपटूंना स्वप्नवत वाटणाऱ्या या इमारतीचे काम अखेर पूर्ण होणार का? कि अजूनही त्यांना संघर्ष करावा लागेल? – याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे!