
पुणे : शिवाजीनगर गावठाण भांबुर्डा येथील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री उत्सवानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मंदिराच्या प्रांगणात सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रम दररोज सायंकाळी होणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते आदी उपस्थित होते.
शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ह.भ.प. गणेश महाराज भगत व सहकारी यांचा ‘अभंगवाणी’ हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७.३० वाजता उद्धार प्रस्तुत ‘अर्पण’ कार्यक्रमात डॉ. आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्या यांचे कथक नृत्याचे सादरीकरण होईल. रविवारी (दि.२३) सायंकाळी ७.३० वाजता ‘रंग उषेचे’ हा प्रख्यात गायिका उषा मंगेशकर यांच्याशी दिलखुलास गप्पा हा मुलाखतीचा कार्यक्रम हे उत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे.
सोमवारी (दि.२४) सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध गायक व संगीतकार पं. कल्याण गायकवाड व कौस्तुभगायकवाड यांचा स्वरानुभूती हा सांगीतिक कार्यक्रम असून गायिका कार्तिकी गायकवाड पिसे या देखील सादरीकरण करणार आहेत. मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ६ वाजता मंदिरात शिव पार्वती विवाह सोहळा व मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये समर्थ ढोल ताशा पथकाचे वादन देखील असणार आहे. श्री जंगली महाराज मंदिर, शिवाजीनगर गावठाण मार्गे मंदिरात मिरवणूक येणार आहे.
बुधवारी (दि.२६) रात्री १० वाजता श्री सद्गुरु जंगली महाराज भजनी मंडळाचे भजन होणार आहे. तर, गुरुवारी (दि.२७) सायंकाळी ६ वाजता नटरंग अकादमीचा कथक नृत्य त्रिपुंड कला अविष्कार सादर होईल. ग्रामदैवत श्री रोकडोबा देवस्थान ट्रस्ट, श्री सद्गुरु जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट, श्री सद्गुरु जंगली महाराज भजनी मंडळ, श्री शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, छत्रपती शिवाजीनगर भांबुर्डा ग्रामस्थ, समर्थ प्रतिष्ठान पुणे, ऊर्जा ध्यान केंद्र, वृद्धेश्वर चौपाटी यांचे विशेष सहकार्य उत्सवाला मिळाले आहे. उत्सवात धामिक कार्यक्रम तसेचा दररोज दुपारी ३ वाजता विविध भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर जीवनगौरव पुरस्कार सोहळा बुधवारी (दि.२६)
श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर जीवनगौरव पुरस्कार सोहळा बुधवारी (दि.२६) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत प.पू. योगीराज भाऊमहाराज परांडे यांना धार्मिक क्षेत्रातील, माजी स्थायी समिती सदस्य बाळासाहेब बोडके यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार ह.भ.प. राजाभाऊ रंधवे (चोपदार) यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, फेटा हे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, शोभा धारिवाल, श्रीकांत शिरोळे, पुनीत बालन, दत्ता बहिरट, राघवेंद्र मानकर आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत