
पुणे: राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी आपला सन 2024 ते 2019 या कार्यकाळात करावयाच्या कामांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सर्वसामान्य लोकांना हक्काची घरे, आरोग्याच्या सुविधा, पाणीपुरवठा तसेच पायाभूत सुविधा आणि इतर विविध लोकोपयोगी योजना राबविण्याचा संकल्प आमदार अण्णा बनसोडे यांनी जाहीर केला आहे.
दापोडी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, उमेश चांदगुडे इरफान सय्यद माईकाटे चंद्रकांता सोनकांबळे सुजाता पालांडे नंदू कदम शितल हगवणे अमित गोरखे शेखर काटे संजय काटे राजू बनसोडे कविता अल्हाट ज्ञानेश्वर कांबळे अविनाश काटे कुणाल लांडगे, विशाल वाळुंजकर, आनंद ओव्हाळ, सुवर्णा कुटे, सरिता साने, तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगेश बहल म्हणाले, राष्ट्रवादीचा कर्तव्यपूर्ती आणि संकल्प अहवाल जाहीर झाला आहे. दापोडी मध्ये फिरंगाई देवीच्या आरतीने पदयात्रा झाली. दापोडीचे मताधिक्य सर्वाधिक असायला हवे, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
आमदार अमित गोरख म्हणाले, आमदार अण्णा बनसोडे यांनी 2024 ते 2019 या कार्यकाळासाठी बनवलेला संकल्प अहवाल सर्व मित्र पक्षांना विश्वासात घेऊन तयार केला आहे. पुढील काळात हे सर्व संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”
संपूर्ण पिंपरी मतदारसंघात मेट्रोचे जाळे उभारणार असून चाकण, तळवडे व हिंजवडी परिसर जोडणारा मेट्रोमार्ग उभारणे. शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याच्या नियोजनासाठी पवना धरणाची उंची वाढवणे किंवा इतर पर्यायी व्यवस्था करणे. विधानसभा क्षेत्रातील सर्व झोपडपट्याचे पुनर्वसन करणे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्वस्त घरे उपलब्ध करून देणे, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील शासकीय कार्यालये, पोलीस आयुक्तालय, पोलीस स्टेशन व पोलीस कॉलनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अद्ययावत करणे. स्व. बाळासाहेब ठाकरे, वल्लभनगर, एस.टी. स्टँडचा पुनर्विकास करणे. पिंपरी येथे माता रमाई स्मारक, निगडी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक, पिंपरी गावात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्रावर थीम पार्क उभारणे, अशा कामांचा संकल्प पत्रात समावेश आहे.
शहरात अंडर वॉटर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारले जाणार आहे. जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत योजना सुरू करणे. मतदारसंघातील पाच रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करणे. कोरोना काळात बंद झालेल्या लोकल फेऱ्या पुर्ववत सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
मतदारसंघातील सर्व उद्याने, महापालिका शाळा, रस्ते, पाणी पुरवठा, जलनिःसारण इत्यादी सुसज्ज व अद्यावत करणे. अपंग, निराधार, वृद्ध यांच्यासाठी शहरामध्ये मोफत होम स्टे, निवारा उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
मतदार संघातील लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभागनिहाय जनसंपर्क कार्यालय सुरू केले जाणार आहे. अण्णा बनसोडे 15 दिवसातून एक दिवस या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. तसेच जनसंपर्क कार्यालयात 24×7 टोल फ्री कॉल सेंटर सुरू केले जाणार आहे.
दापोडी येथील विहारामध्ये ध्यानकेंद्र, स्पर्धापरिक्षा केंद्र, परीक्षा केंद्र अद्यावत करणे. दापोडी येथील त्रिलोक बौद्ध विहारास आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात जेष्ठ नागरिक महासंघासाठी अद्यावत व सुसज्ज जेष्ठ नागरिक भवन उभारणार असल्याचे घोषणापत्रात नमूद आहे.
स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष स्थापन करून शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार योजना, मुद्रा योजना व विविध महामंडळाच्या योजनांमार्फत बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देऊन स्वतःच्या पायावर उभा करण्याचा मानस. संभाजीनगर व शाहूनगर परिसर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नियंत्रणात आणणे. छत्रपती संभाजी उद्यानाच्या समोरील जागेत अद्यावत बस टर्मिनल व सुसज्ज पार्किंग तसेच प्रेक्षागृहाची उभारणी. संभाजीनगर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाची निर्मिती.
हाफकिन संस्थेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यासाठी स्वतंत्र घरकुल योजनेची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. पवनानदी काठावर संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात येईल.महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वतंत्र व्यापार संकुलाची निर्मिती केली जाणार असल्याचे म्हटले आहे.