
पुणे: रती देशमुख यांनी काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील प्रसंगाची मधुबनी शैलीत काढलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच प्रमुख पाहुणे प्रसिध्द इतिहास तज्ञ प्रसाद तारे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र भावी पिढीपर्यंत योग्यपणे पोहाचावयचे असेल तर व्याख्यानां बरोबरच तशी कृती केली पाहिजे राजमाता जिजाऊंनी शिवरायांना घडवण्याचे कार्य केले त्यांची भूमिका करण्याची संधी मला मिळाल्यामुळे मी परमेश्वराची कृतज्ञ आहे. आता भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आपली आहे असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.
भारतीय चित्रकलेची परंपरा जगात सर्वात जुनी म्हणजेच 50 लाख वर्षापासून चालत आली आहे , छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे गोवळकोंडा कलाशैलीत काढण्यात आली अशी माहिती इतिहास तज्ञ प्रसाद तारे यांनी दिली.
मधुबनी शैलीत काढलेले हे महाराजांचे चित्र चरित्र कदाचित पहिलेच असेल असेही ते म्हणाले.
या चित्रांचे प्रदर्शन महाराष्ट्रभर करण्यासाठी संयोजनाचे काम मी करणार आहे, असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रकार रमा घारे, प्रसिद्ध चित्रकार उत्तम साठे, संस्कार भारतीचे प्रफुल्ल भिष्णूर्कर, सौ लीना आढाव हे उपस्थित होते.
आसावरी बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रती देशमुख यांनी आभार मानले.
हे प्रदर्शन १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत बालगंधर्व कलादालन , शिवाजीनगर , पुणे येथे बघण्यासाठी उपलब्ध असेल, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावं असे आवाहन रती देशमुख यांनी केले.