
पुणे: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १९व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथून दूरस्थ पद्धतीने करण्यात आले. या निमित्ताने नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात किसान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार शरद सोनवणे, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, पुणे जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, अटारी पुणेचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली सय्यद, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील ३०० हून अधिक शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी बोलताना मंत्री मोहोळ म्हणाले की, या योजनेअंतर्गत आतापर्यंत ९.२५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ३.६७ लाख कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. ही योजना जगातील सर्वात मोठी DBT (Direct Benefit Transfer) योजना आहे. तसेच, १.३५ कोटी कुटुंबांना घरे, ९ कोटी महिलांना उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला आहे. सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून NCO, BBSL संस्थांची निर्मिती तसेच ७०,००० ग्रामीण सोसायट्यांचे ऑनलाईन जाळे तयार करण्यात आले आहे.
शेतीच्या विकासासाठी कृषीपूरक व्यवसाय महत्त्वाचे असल्याचे सांगून मोहोळ म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी क्षेत्रासोबत पूरक उद्योग निर्माण करणे गरजेचे आहे. राज्यातील ९ कोटी आणि पुणे जिल्ह्यातील सुमारे ४.५ लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकरी उद्योजक अश्विनी उभे, स्वाती कबाडी, शांताराम वारे, सागर चिखले, विलास काळे, विद्या थोरात, मनीषा बांगर यांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कृषी प्रदर्शन आणि मार्गदर्शन सत्र
यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला मोहोळ यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच केंद्रातील विविध संशोधन विभागांची माहिती घेतली. आमदार शरद सोनवणे यांनी कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेटची मागणी केली.
नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात मृदाशास्त्र विषयतज्ञ योगेश यादव यांनी नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषिरत्न अनिल मेहेर यांनी केले, तर सूत्रसंचालन कृषी विस्तार विषयतज्ञ राहुल घाडगे यांनी केले.