
पुणे, ता ५: सहयोगनगर, निगडी, पुणे येथील रहिवासी व डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले ट्रस्ट, राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक व ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठलराव शिवराम गवळी (वय ७३) यांचे नुकतेच आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे आहेत. त्यांच्यावर निगडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती.
अल्पपरिचय
विठ्ठलराव गवळी हे धामणगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील रहिवासी. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. त्यातून शिक्षण घेत त्यांनी उदरनिर्वाहासाठी पुण्यातील टेल्को कंपनी गाठली. लग्नानंतर संसार सांभाळून मुलाबाळाचे शिक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असते. ती पार पाडत असताना आपल्यासारख्याच गरीबीत जीवन जगणाऱ्या समाजासाठी काय करावे, ही चिंता विठ्ठलराव यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी त्यांच्या मित्रांच्या सोबत रुपीनगर शिक्षण संस्था, सम्राट अशोक मित्रमंडळ या संस्था स्थापन करून त्यामार्फत समाजसेवा सुरू केली. त्यानंतर १९९३ साली स्वतःची डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले ट्रस्ट स्थापन करुन शिक्षण, वाचन व पतसंस्था या क्षेत्रात स्वतंत्र व दमदार वाटचाल सुरू केली. ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येणारी शाळा व इतर उपक्रम राबविताना अनेक आर्थिक अडचणी आल्या. पण त्यावर मात करून विठ्ठलराव यांनी समाजातील दानशूर लोकांचे, संस्थांचे हितसंबंध तयार करून वाट काढली. शिक्षणसंस्था तीही मागास समाजातील व्यक्तीची असल्यानेही खूप अडचणी यायच्या पण मनमिळाऊ स्वभाव, सर्वांना सहकार्य करण्याची वृत्ती व समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाची ज्योत पेटविण्याची उर्मी या बळावर विठ्ठलराव गवळी यांनी संकटावर मात केली. त्यांनी निर्माण केलेल्या संस्था मग ते ज्ञानप्रभात विद्यालय असो, वाचनालय असो किंवा पतसंस्था असो आजही दिमाखात कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील अनेकांच्या जीवनात आनंद पेरला जात आहे.