
जालना – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वढोदा गावात धनगर समाजाच्या तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ धनगर क्रांती सेना महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
धनगर क्रांती सेना महासंघाच्या वतीने पाठवलेल्या या निवेदनात उल्लेख आहे की, या हत्याकांडामुळे संपूर्ण धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष आहे. जर तातडीने योग्य कारवाई झाली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हत्येच्या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. प्रशासनाने दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
या निवेदनावर धनगर क्रांती सेना महासंघाचे अध्यक्ष भरत महानवर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्याही आहेत. महासंघाने प्रशासनाला इशारा दिला आहे की, न्याय मिळेपर्यंत समाज शांत बसणार नाही.