
पुणे – नवोदित लेखकांना प्रेरणा व दर्जेदार मार्गदर्शन मिळावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि समर्थ युवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होय, मी लेखक होणारच!’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठात येत्या १५ ते १८ मार्चदरम्यान ही कार्यशाळा होणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत या कार्यशाळेच्या आयोजनाची माहिती देण्यात आली. ‘मीडिया नेक्स्ट’चे संचालक श्री. अभय कुलकर्णी, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य श्री. प्रसेनजीत फडणवीस, विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, माध्यम सल्लागार व मुक्त आशयनिर्माते श्री. प्रसाद मिरासदार यांनी या उपक्रमांच्या आयोजनाविषयीची माहिती दिली.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशानंतर वाचकांचा वाढता प्रतिसाद आणि नव्या लेखकनिर्मितीची गरज लक्षात घेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे आयोजक, पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य, तसेच राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक श्री. राजेश पांडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात जरी माहिती सहजगत्या उपलब्ध होत असली, तरी वैचारिक लेखन आणि दर्जेदार सर्जनशीलतेला मोठे महत्व आहे. नवोदित लेखक, विद्यार्थी आणि युवा साहित्यप्रेमींना लेखनाची सखोल समज, तांत्रिक दृष्टिकोन आणि सृजनशीलतेचा विकास करण्याची संधी मिळावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
कार्यशाळेची प्रमुख वैशिष्ट्ये –
दिनांक: १५ ते १८ मार्च २०२५
स्थळ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
निवड प्रक्रिया: ३०० निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश
साहित्य प्रकार: कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, पटकथा लेखन इत्यादी.
उद्घाटन समारंभ आणि विशेष उपस्थिती:
कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ १५ मार्च रोजी दुपारी ४:०० वाजता होणार असून, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक श्री. प्रवीण तरडे व राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक श्री. युवराज मलिक व उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेतून साध्य होणाऱ्या बाबी –
● दर्जेदार लेखनाचे तंत्र आत्मसात करणे.
● कथा, कविता, निबंध, समीक्षा, पटकथा यांसारख्या विविध लेखनप्रकारांची ओळख होणे.
● संपादन आणि प्रकाशन प्रक्रियेची माहिती घेणे.
● अनुभवी लेखक आणि संपादकांचे मार्गदर्शन.
● स्वलेखनासाठी प्रेरणा आणि दिशा मिळणे.
—
अधिक माहितीसाठी संपर्क – प्राचार्य डॉ. संजय चाकणे (9890171857), अमोघ वैद्य (7972050765)