
सांगली: सीएनआय सिनॉडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस (CNI SBSS) चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, कोल्हापूर प्रकल्पाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’ निमित्त ‘लैंगिक समानता अभियान’ अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सांगली इंडस्ट्रियल स्कूल मिशन कंपाउंड येथे पार पडला.
कार्यक्रमाला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा निवेदिता ढाकणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी अतुल नांद्रेकर, सांगली जिल्हा उद्योग केंद्राचे शिवाजी त्रिमुखे, ॲड. तनुजा सदामते, तसेच डॉ. सौ. सुजाता बरगाले आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी महिलांसाठी उपलब्ध शासकीय योजना, अर्थसहाय्य, कर्जप्रक्रिया, महिलांचे हक्क व कायदे, आर्थिक साक्षरता, स्वावलंबन आणि मनोशारीरिक आरोग्य यासंदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वकिली, पत्रकारिता आणि उद्योग व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिला सन्मान पोस्टर रॅली, वॉल पेंटिंग यांसारखे उपक्रमही राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक योसेफ आवळे यांनी केले. आयोजनासाठी संग्राम चावरेकर, विद्या आवळे, मिलन कामत, निलेश सावंत, विजया ऐतवडेकर यांच्यासह रविंद्र तिवडे, संतोष सदामते, विशाल सौंदडे, मिलिंद कांबळे, दयानंद कोठावळे, सुनील कांबळे, रणजित केंचे यांनी परिश्रम घेतले.
सुमारे 500 महिलांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांतून उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला.
याच सप्ताहात, 6 मार्च ते 8 मार्च 2025 या कालावधीत मौजे डिग्रज, हेरले, कवठे पिरान, नांद्रे, माळवाडी, हरोली, मजले आणि हलोंडी येथे महिलांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन, सुरक्षा-सक्षमीकरण जनजागृतीसाठी पपेट शो, तसेच कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.