
पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक भान जपणारे आणि महिलांच्या समस्यांना वाचा फोडणारे नाटक “मोठी झालीस तू” सादर करण्यात आले. सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक देवदत्त पाठक आणि सहाय्यक दिग्दर्शक मिलिंद केळकर यांनी या संवेदनशील विषयावर धाडसी पाऊल उचलले आहे.
मुलींच्या पहिल्या मासिक पाळीच्या अनुभवांवरील सामाजिक दडपण, मानसिक संघर्ष आणि अन्यायकारक वागणूक यावर भाष्य करणारे हे नाटक महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. आजही अनेक ठिकाणी मासिक पाळी हा विषय टाळला जातो, त्याबद्दल गैरसमज पसरलेले आहेत, आणि मुलींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी “मोठी झालीस तू” हे नाटक मार्गदर्शक ठरू शकते.
या नाटकाचे प्रयोग महिला मंडळे, शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात आहेत. गुरुस्कूल गुफान या संस्थेच्या निर्मितीत सादर झालेल्या या नाटकात विद्यार्थी कलाकारांनी जीव ओतून अभिनय केला आहे. यामध्ये गौरी पत्की, निर्मिती करपे, ऋतुजा केळकर, धनश्री गवस, अक्षदा वाघवसे, अक्षता जोगदनकर, अर्णव देशपांडे आणि अंतरिक्ष बेंद्रे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
या नाटकाच्या निमित्ताने महिलांच्या मासिक पाळीविषयी समाजात जागृती निर्माण होऊन गैरसमज दूर व्हावेत, मुलींना या प्रक्रियेबाबत आत्मविश्वास मिळावा आणि त्यांच्यावर होणारा अन्याय थांबावा, हा प्रमुख उद्देश आहे.
“महिलांना रोजच सन्मान देऊया, त्यांना न्याय मिळवून देऊया आणि समानतेने वागवूया”, असे आवाहन लेखक-दिग्दर्शक प्रा. देवदत्त पाठक यांनी केले आहे. समाजातील सर्व संस्था, शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन “मोठी झालीस तू” या नाटकाचे प्रयोग घडवून आणावेत, असेही त्यांनी सांगितले.