
पुणे, दि.१७ : महाराष्ट्र राज्यातील पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांना स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी नीटनेटकेपणा,टापटीपणा व व्यवसाय वृद्धिगत होण्यासाठी म्हणून तसेच स्वच्छ व सुरक्षित अन्न ग्राहकांना मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियान अंतर्गत विशेष बक्षीस योजना आज महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी जाहीर केली आहे.
काशिनाथ नखाते सांगितले की, पथारी, हातगाडी, टपरीच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच वेगळा राहिलेले आहे. पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्याची तयारी, तसेच व्यावसाय पर्यावरणपुरक आणि कमीत कमी प्लास्टिकचा वापर यासाठी दोखील ही स्पर्धा महत्वाची असणार आहे.
या स्पर्धेत आकर्षक हातगाडी, आकर्षक स्टॉल व्यवसायाची जागा नीटनेटकेपणा मांडणी याला प्राधान्य असणार आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच होणारी ही स्पर्धा पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी आहे. यानंतर राज्यव्यापी स्पर्धेचा मानस महासंघाचा असल्याची माहितीही नखाते यांनी दिली.
विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्हे, रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस ५१,१११ द्वितीय बक्षिस २१,१११ आणि तृतीय बक्षिस ११,१११ तसेच 5 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाहीत.
सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/hqvwhc9bhBsPkPHN8 या गुगल फॉर्मच्या लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी लागणार आहे. विहित नमुन्यातील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरून फोटो अपलोड करावेत. या स्पर्धेचा ऑनलाईन नोंदणीसाठी १७ मार्च २०२५ ते १७ एप्रिल २०२५ पर्यंतचा कालावधी असणार आहे.
स्पर्धेतील सहभागासाठी मनपाचे फेरीवाला प्रमाणपत्र, ओळखपत्र ,फेरीवाला सर्वेक्षण पावती, फेरीवाला यादीत नाव तसेच अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र असल्यास इतर प्रशिक्षण प्रमाणपत्र यातील अधिक कागदपत्रांचा समावेश असावा.
या स्पर्धेत अधिकाधिक विक्रेत्यांनी सहभाग व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 9527901000 या क्रमांकावर संपर्क साधावा.
यावेळी पुणे सचिन कामठे, पुणे मनपा सदस्य गजानन पवार, पिंपरी चिंचवड मनपा समिती सदस्य किरण साडेकर,अलका रोकडे, किसन भोसले, सलीम डांगे यांचे सह निमंत्रक राजेश माने संघटक अनिल बारवकर, इरफान चौधरी,सलीम शेख आदी उपस्थित होते.