
पुणे – महाराष्ट्रातील विविध बँकामधील बँकेच्या विकास व प्रगतीसाठी झटत असलेल्या 20 हजाराहून अधिक बँक मित्रांवर (बँक एजंट ) होतं असलेल्या मुसकटदाबी व अन्यायाविरुद्ध आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात संघटनेतर्फे दिनांक 1मे 2025 मागणी दिन आंदोलन संपूर्ण राज्यात करण्यात येणार आहे.
दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधीना भेटून संघटनेतर्फे बँक मित्रांच्या विविध मागण्याचे निवेदन दिले जाणार आहे. बँक मित्रांवर होतं असलेल्या अन्यायाची माहिती प्रत्यक्ष भेटून दिली जाणार आहे. त्यांच्यावरील होणारा अन्याय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करावेत अशीही विनंती केली जाणार आहे.
संघटनेतर्फे रविवारी शुक्रवार पेठेतील वरदश्री सभागृहात राज्यातील बँक मित्रांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा आदी भागातील 23 जिल्ह्यातील विविध संघटनेचे 102 बँक मित्र प्रतिनिधी उपस्थित होते.
या सभेस संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड देविदास तुळजापूरकर, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या जॉईंट सेक्रेटरी ललिता जोशी, शिरीष राणे, शैलेश टिळेकर,स्टेट फेडरेशनचे पदाधिकारी सुमित नंबियार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बँक मित्रांच्या सभेत बोलताना संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड देविदास तुळजापूरकर म्हणाले की, बँकेची सेवा व महत्व पोहचवण्याचे कार्य बँक मित्र करतात. त्यांची ही महत्वाची भूमिका व कार्याकडे केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. बँक मित्रांना स्थर्य वा सुरक्षितता देण्याची गरज आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. तरच बँकिंग क्षेत्राचा विकास होईल. ग्राहकांचा विश्वास बसेल. तसेच जनधन सारखी विविध योजनाना नागरिकांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळेल.
बँक मित्रांना तुटपुंज्या व अल्पशा कमिशनवर काम करावे लागत आहे. त्यांना मिळणाऱ्या कमिशनच्या रक्कमेत वाढ करावी.त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता दिली जात नाही. रजा, मेडिकल सुविधा, सुट्ट्या, सेवा व कोणत्याही प्रकारच्या सवलती दिली जात नाही. बँक व्यवस्थापनाने मध्यस्थी करणाऱ्या कंपन्यांची सेवा बंद करून थेट बँक मित्रांबरोबर काम, सेवा आदी कामांविषयक कॉन्ट्रॅक्ट करावे. अशा मागण्या या सभेत सभेस उपस्थित असलेल्या बँक मित्र प्रतिनिधीकडून करण्यात आल्या.