
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाकडून विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई सुरू असल्याचा आरोप करत नॅशनल हॉकर फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने थेरगाव येथे मुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या कारवाईमुळे गोरगरीब विक्रेत्यांचे रोजगार हिरावले जात असल्याने महापालिका आयुक्तांनी ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
अंधाधुंद कारवाईमुळे अस्वस्थता, बेरोजगारीचा धोका – मानव कांबळे
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून फक्त गरीब विक्रेत्यांवरच कठोर कारवाई करण्यात येत आहे, तर मोठ्या बड्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केला. “गोरगरिबांना सतावू नका, अन्यथा बेरोजगारीमुळे अराजकता निर्माण होईल,” असा इशारा त्यांनी दिला.
अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष, गोरगरीबांवरच कारवाई!
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे यांनी आंदोलकांची भेट न घेतल्याने संताप वाढला आहे. ननावरे फक्त श्रीमंतांच्या हितासाठी काम करत असून गरीब विक्रेत्यांना चिरडण्याचे काम करत आहेत, असा आरोप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. “त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक अवैध धंदे सुरू आहेत, पण त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी फक्त विक्रेत्यांवरच अन्यायकारक दडपशाही सुरू आहे,” असे महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी सांगितले.
विक्रेत्यांना हक्काचे संरक्षण द्या – महासंघाची मागणी
श्रमिकांसाठी असलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे मत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले. “कामगारांचे हक्क डावलले जात असल्याने विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महानगरपालिका प्रशासनाने अन्यायकारक कारवाई तातडीने थांबवावी आणि विक्रेत्यांना कायद्यानुसार संरक्षण द्यावे,” अशी मागणी करण्यात आली.
उपोषणाला विक्रेत्यांचा मोठा पाठिंबा
या आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, बालाजी लोखंडे, सचिन बोर्डे, दत्ता शेरखाने, रवींद्र गायकवाड, नंदू आहेर, सुनील भोसले, मुजमिल काझी, शरीफ सय्यद, सोमनाथ मारने, कालिदास गायकवाड यांच्यासह अनेक विक्रेत्यांनी सहभाग घेतला. तसेच उपोषणकर्ते अक्का लोंढे, मंगल श्रीराम, जरीना शेख, राजेंद्र कुटकर, सलीम डांगे, नौशाद मणियार, नवनाथ जगताप यांच्यासह ग आणि ड क्षेत्रीय विभागातील विक्रेतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेने लवकरच योग्य तो निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.