
पुणे: पुणे महानगरपालिकेत तब्बल 26 हजार कोटी रुपयांचा केबल डक्ट घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात पुणे पोलिस सहआयुक्त रंजनकुमार यांना शुक्रवारी निवेदन देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे
माने यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना या घोटाळ्याची माहिती देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेच्या विरुद्ध निर्णय?
माने म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुंबईतील ओव्हरहेड केबल आणि डक्ट संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यांनी महापालिकांनी कंपन्यांकडून खोदाई आणि पुनर्स्थापना शुल्क नियमानुसार वसूल करावा, असे निर्देश दिले होते. मात्र, पुणे महानगरपालिकेने या भूमिकेच्या विरोधात निर्णय घेतल्याने महापालिकेचे तब्बल 24 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला.
महापालिकेला फक्त १०% महसूल?
माने यांनी सांगितले की, महापालिकेला वार्षिक ६ कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यातील ९०% रक्कम संबंधित कंपनी स्वतःकडे ठेवणार असून, महापालिकेला केवळ ६० लाख रुपये मिळणार आहेत.
1800 कोटींचा दंड आणि 23 हजार कोटींचे शुल्क टाळले?
पुणे शहरात अनेक केबल कंपन्यांनी बेकायदेशीर काम केले असून, महापालिकेने त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. नियमांनुसार, १८०० कोटी रुपयांचा दंड आणि भूमिगत केबलसाठी २३ हजार कोटी रुपयांचे शुल्क वसूल करणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेने ही माहिती दडवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुनील माने यांनी केली आहे. आता पुणे पोलिस आणि प्रशासन या आरोपांची दखल घेणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.