
पुणे: पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांच्या प्रचारार्थ आकुर्डी येथे महिला मेळावा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग घेतला.
उपस्थितांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे या म्हणाल्या की , सुलक्षणा ताईच आगामी आमदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना, त्यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयामध्ये मिळालेल्या जनसमर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सुलक्षणाताईंच्या माध्यमातून मतदारसंघातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
‘बटेंगे तो कटेंगे’ नारा देणाऱ्यांवर सवाल उपस्थित करताना, कोरोनाकाळात लसीकरणाच्या वेळेस हा नारा का दिला गेला नाही, अशी टीका केली. सुलक्षणाताई स्वाभिमानी लोकप्रतिनिधी बनून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी मतदारांना शाश्वत विकासासाठी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील क्रमांक दोनवरील बटण दाबून सुलक्षणा धर यांना सेवा करण्याची संधी देण्याचे खा. सुळे यांनी आवाहन केले.