
पुणे : जयवंत दळवी आयुष्यात कधीही माणसात रमले नाहीत; परंतु त्यांच्या लेखनातून मात्र ते कायम माणसातच रमलेले दिसतात. व्याकरणातील सगळे रस त्यांनी लेखनात वापरले त्यातील रौद्र, बिभत्स, शृंगार, क्रोध असे अनेक टोकाचे रस वापरताना देखील त्यांचा कधीही तोल गेला नाही. ढोल न पिटता स्त्रीवादी लेखकाची भूमिका जयवंत दळवी यांनी उत्तम रितीने पार पाडली, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी केले. कार्यक्रमाला पुणेकरांची गर्दी पाहता जयवंत दळवी यांची लोकप्रियता आजही टिकून आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
विख्यात लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘कॅलिडोस्कोप : जयवंत दळवी’ या विशेष कार्यक्रमाचे आज (दि. 25) बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गिरीश जयवंत दळवी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी संजय मोने बोलत होते. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या जान्हवी जानकर, प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती चिटणीस, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, सतिश जकातदार, शैलेश दातार, राजेश दामले मंचावर होते. कार्यक्रमाची निर्मिती संवाद, पुणेचे सुनील महाजन यांची तर संहिता लेखन सतीश जकातदार यांनी केले. संयोजन निकिता मोघे यांनी केले. नाटक, चित्रपटातील दृश्ये, सशक्त अभिवाचनातून जयवंत दळवी यांचे समग्र दर्शन घडले.
रेखा इनामदार-साने, प्रसाद ओक, शरद पोंक्षे, विजया मेहता, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे जयवंत दळवी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. ‘बॅरिस्टर’, ‘नातीगोती’, ‘सूर्यास्त’ या नाटकांमधील, ‘चक्र’, ‘रावसाहेब’, ‘महानंदा’, ‘उत्तरायण’, ‘पुढचं पाऊल’ चित्रपटांची झलक या निमित्ताने पाहायला मिळाली.
अभिवाचन कार्यक्रमात अभिनेत्री स्वाती चिटणीस (नातीगोती), शैलेश दातार (स्वगत), राजेश दामले (मोहिनी दिवाकर), अभिनेते संजय मोने (ठणठणपाळ) यांचा सहभाग होता.
जयवंत दळवी यांच्या नाट्यकलाकृती, त्यांच्या प्रत्यक्ष भेटी याविषयी संजय मोने यांनी आठवणींना उजाळा दिला. ग्रामीण, शहरी पार्श्वभूमी, यांत्रिकीकरणामुळे झालेले बदल अशा विविध विषयांवरील उत्तम साहित्यकृतींची निर्मिती जयवंत दळवी यांनी केलेली दिसते. कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता दळवी यांनी शांतपणे आणि तटस्थपणे लेखन केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
साहित्यिक कार्यक्रमाला झालेली पुणेकरांची गर्दी आनंददायक आहे, असे सांगून रामदास फुटाणे म्हणाले, जयवंत दळवी यांच्या सहवासातील अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये संवादचे सुनील महाजन अविरतपणे कार्यरत आहेत, याबद्दल त्यांनी कौतुक केले.
विजया मेहता म्हणाल्या, जयवंत दळवी हे मनस्वी दडपण घेऊन वावरणारे लेखक होते. त्यांच्या कलाकृतीत विषयाची मांडणी आणि पात्रे यांची चपखलता जाणवते.
रेखा इनामदार-साने म्हणाल्या, दळवी लोकप्रिय आणि गंभीर लेखक होते. त्यांच्या लिखाणात वास्तवाचे यथातथ्य चित्रणच नव्हे तर त्याला कल्पनेची जोडही होती. समकालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीची नस त्यांना उमगली होती.
विक्रम गोखले म्हणाले, मानवी मनाची गुंतागुंत सक्षमपणे मांडणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी होय. दिलीप प्रभावळकर म्हणाले, अभिनेता म्हणून दळवींची नाटके केल्याने माणूस म्हणून माझ्या व्यक्तीमत्त्वात खूप मोठा फरक पडला. माझ्या लिखाणावरही दळवी यांच्या लेखनाचा मोठा प्रभाव आहे.
शरद पोंक्षे म्हणाले, मनात आलेला प्रत्येक विचार सगळ्यांना बोलता येत नाही. ते विचार आपल्या लेखनातून मांडणे हे दळवी यांच्या नाटकातील व्यक्तिरेखेचे वैशिष्ट्य होय. दळवींनी लिहिलेली पात्रे अभिनित करताना व्यक्तिरेखांच्या आत शिरून विचार कसा करायचा हे मला उमगले. सुसंस्कृतपणाचा बुरखा फाडून लेखन ही दळवी यांची हातोटी होती.
प्रसाद ओक म्हणाले, माझ्या आयुष्यातील दळवी यांचे स्थान मोलाचे आहे. ते अस्सल नाटककार होते.