
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात सर्वच क्षेत्रीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे 269 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संवेदनशील खात्यात हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. कंत्राटी पद्धतीने काम करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुणे महानगरपालिकेकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोंद नसल्याने त्यांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या या सेवकांना तुटपुंजे वेतन असून, आहे त्या वेतनामध्ये ते विनातक्रार काम करतात. तसेच कोरोना काळामध्येही या सेवकांनी कोणतीही तक्रार न करता अतिशय प्रामाणिकपणे काम केले आहे. आता या सेवकांची बदली ही राहत्या घरापासून सुमारे 20 ते 25 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर करण्यात आलेली आहे. त्यांना मिळणारे वेतन, त्यामध्ये प्रवासखर्च तसेच घराची जबाबदारी यामुळे या सेवकांवर मोठा आर्थिक ताण येत असून याचा परिणाम हा अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर पडत आहे. बदली केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी किंवा त्यांच्या राहत्या घरापासून जवळच्या अंतरावर असलेल्या क्षेत्रीय कार्यालयामध्येच बदली करण्यात यावी. जेणेकरून त्यांना पडणारा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच या सर्व कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया कर्मचाऱ्यांना आपण पुणे महानगरपालिकेत रोजंदारी सेवेत सामावून घेण्यात यावे.
यासंदर्भात आज आयुक्त साहेबांची भेट घेऊन योग्य ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. यावर आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.