
पुणे – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील भोसरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो, पुणे यांच्या पथकाने केली.
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली असून, आरोपी महिला पोलीस शिपाई रेणुका बाळू नाइकरे (वय 33) हिने तक्रारदाराकडून 2000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. तक्रारदाराविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही लाच मागितल्याचे समोर आले आहे.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केल्यानंतर, पुणे एसीबीच्या पथकाने सापळा रचून रेणुका नाईकरे हिला 4 ऑगस्ट रोजी भोसरी पोलीस स्टेशनच्या आवारात 1000 रूपयांची लाच घेऊन पळून जात असताना अटक केली.
या प्रकरणात पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
एसीबी पुणे विभागाने नागरिकांना भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास पुढील संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे:
- टोलफ्री क्रमांक: 1064
- हेल्पलाईन क्रमांक: 9323050000
- ई-मेल: dyspacbpune@mahapolice.gov.in