
मुंबई : दादर – शिवसेवा प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक’ या लघुपुस्तकाचा प्रकाशन सोहळा श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर, ६ एप्रिल २०२५ रोजी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्ताने तयार करण्यात आलेले हे पुस्तक चित्रांसह समृद्ध असून, सांगलीच्या लेखिका सौ. विनिता तेलंग यांनी त्याचे लेखन केले आहे. निलकंठ प्रकाशन, पुणे यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
प्रकाशन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह मा. दत्तात्रेय होसबळे, होळकर घराण्याचे वंशज मा. उदयसिंह होळकर आणि मुंबई महानगराचे संघचालक मा. सुरेश बघेरिया यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. धनंजय चंद्रात्रे, संचालक प्रमोद देशपांडे, राजेश कामठे आणि अभिजीत चिणे यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील सुमारे ३,००० मान्यवर उपस्थित होते.
शिवसेवा प्रतिष्ठानने या पुस्तकाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रेरणादायी चरित्र महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. प्रतिष्ठानच्या २०२५ च्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायरी’च्या यशस्वी वितरणानंतर हा पुढचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.