
मुंबई : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आदिवासी विकास विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण पोर्टल्सचे ई-उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. या डिजिटल पुढाकारामुळे आदिवासी समाजाच्या सर्वसमावेशक विकासाला चालना मिळणार असून, भविष्यातील परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास मंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या दोन दिवसीय प्रकल्प अधिकारी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी, तसेच विभागाचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या नव्या पोर्टल्सच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व कार्यक्षम होणार असून, लाभार्थ्यांपर्यंत सेवांचा जलद वेगाने पोहोच होईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
या उपक्रमामुळे तांत्रिक प्रगतीचा लाभ आदिवासी समाजापर्यंत पोहोचवण्याचा विभागाचा प्रयत्न अधिक बळकट होणार आहे.