
पुणे : राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.जयकुमारभाऊ गोरे यांना ग्रामगौरव मीडिया फाउंडेशन च्या वतीने कृतज्ञता म्हणून ग्रामविकासाचे प्रतीक असलेली बैलगाडी भेट देण्यात आली. नुकत्याच पुणे येथे संपन्न झालेल्या ‘ग्राममर्मी’ सन्मान सोहळा आणि ग्रामसंवाद मेळाव्याला पुणे जिल्हा परिषद विशेषत: ग्रामपंचायत विभागाने केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आयोजक विवेक ठाकरे यांनी ग्राम विकास मंत्री यांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.
ग्रामगौरव मीडिया फाउंडेशन व अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गेल्या 3 एप्रिल रोजी येथील गणेश कला क्रीडा सभागृहात जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायती, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी,महिला बचत गट व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासह गावविकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व गावकारभाऱ्यांना ग्राममर्मी सन्मान देण्याचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थिती देणार होते तथापि ते पालकमंत्री असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या आदेशाने तातडीचा असा गाव भेटीचा अचानक कार्यक्रम लावण्यात आल्याने मंत्री गोरे यांना या कार्यक्रमाला पुण्यात उपस्थित राहता आले नव्हते.त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता भेट स्वीकारताना श्री.ठाकरे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना कार्यक्रमास येता न आल्याबद्दल खंत व्यक्त केली तसेच सर्व पुरस्कारप्राप्त ग्राममर्मीचे कौतुक केले.सरपंचांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपापली गावे जास्तीत जास्त समृद्ध करण्याचे आवाहन केले.
ग्रामगौरव आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुढील कार्यक्रमास निश्चितपणाने उपस्थिती देण्याचे आश्वासन दिले.यावेळी सरपंच परिषदेचे राज्य संघटक सचिन जगताप,ग्रामगौरव मीडिया फाउंडेशनचे मुंबई मंत्रालय ब्युरो हेड किरण वाघ,गौरव रणदिवे, आकाश भंगाळे,वासुदेव नरवाडे,विनोद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.