
कोल्हापूर: शिरोळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांमुळे अखेर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पत्नीला फसवून इम्रान मुल्ला यांनी दोन बेकायदेशीर विवाह केल्याचे उघडकीस आले असून, तिन्ही विवाहांची माहिती समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे.
इम्रान मुल्ला यांचा पहिला विवाह 2015 साली झाला होता. मात्र त्याचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला नसताना, त्यांनी 2019 मध्ये आफरीन मुल्ला यांच्याशी दुसरे लग्न केले. यावेळी इम्रान मुल्ला गोंदिया येथे कार्यरत होते. आफरीन यांच्याशी विवाहानंतर दोघांमध्ये सतत वाद होत होते. आफरीन यांनी शारीरिक आणि मानसिक छळाविरोधात गोंदियातील केशोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर मुल्ला यांना सेवेतून तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.
अफरीन यांनी पाठपुरावा केल्यानंतर 2024 मध्ये तिसऱ्या विवाहाची माहिती समोर आली. 23 जून 2024 रोजी इम्रान मुल्ला यांनी सुहाना कुमार हिच्याशी तिसरे लग्न केल्याची माहिती अफरीन यांना मिळाली. याविरोधात त्यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र कारवाई न झाल्यामुळे त्यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती घेतली आणि पुन्हा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला.
चौकशीदरम्यान इम्रान मुल्ला यांनी सुरुवातीला सुहाना ही केवळ मैत्रीण असल्याचे सांगितले होते. मात्र, तपासात त्यांच्या विवाहाची कबुली सुहाना कुमार यांनीही दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. इम्रान मुल्ला यांनी मुस्लिम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची प्रक्रिया पूर्ण केली असून, तिसरे लग्न कायदेशीर असल्याचा दावा त्यांनी चौकशीदरम्यान केला आहे.
सध्या इम्रान आणि आफरीन यांच्यातील घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असून, इम्रान मुल्ला यांनी आतापर्यंत तीन विवाह केल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलीन झाल्याने, पोलीस प्रशासनाने इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित केल्याचा अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आहे.