
पुणे, 13 एप्रिल 2025: प्रख्यात एकपात्री कलाकार डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या तिन विश्वविक्रमांचा गौरव करणारा भव्य सोहळा पुण्यात उत्साहात पार पडला. 1963 पासून भारतासह नेपाळ, न्यूझीलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया, चीन, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, मॉरिशस, भूतान, रशिया अशा विविध देशांमध्ये ‘सबकुछ मधुसूदन’ हा एकपात्री कार्यक्रम सादर करणाऱ्या डॉ. घाणेकरांनी नुकताच या कार्यक्रमाचा 82,000 वा प्रयोग सादर करत विश्वविक्रम केला.
या सोहळ्यात त्यांनी ‘व्हॉट्सअॅप स्टेटसवरील लिसन माय व्हिसल’ या शीळवादनाच्या एकपात्री कार्यक्रमाचा 1000 वा प्रयोगही सादर केला. त्याचप्रमाणे, गेली 20 वर्षे सातत्याने प्रकाशित होणाऱ्या ‘डहाळी’ या अनियतकालिकाच्या 700 व्या अंकाचे प्रकाशन देखील या सोहळ्यात करण्यात आले. हे तिन्ही उपक्रम डॉ. घाणेकरांच्या वेगळेपणाचे आणि प्रतिभेचे द्योतक ठरले.
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि श्रीदा क्रिएशन तसेच तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक अध्यक्षा प्रिया प्रमोद दामले यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. “डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी आजवर विविध क्षेत्रांमध्ये 300 हून अधिक विश्वविक्रम केले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला असला तरी त्यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांच्या कार्यातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल,” असे गौरवोद्गार प्रिया दामले यांनी डॉ. घाणेकरांचा सत्कार करताना काढले.
या कार्यक्रमाला रंगकर्मी चित्रा साठ्ये, अभिनेते अभिषेक खेडकर, ख्यातनाम ज्योतिर्विद डॉ. जयश्री बेलसरे, दत्तोपासक मेघना मधुसूदन घाणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमोद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहर कार्याध्यक्षा आणि वर्ल्ड क्वीन बीजच्या अध्यक्षा मधुकर्णिका सारिका सासवडे, कवी सुनील जोशी, वर्ल्ड लिटरेचर संस्थेच्या दीपाराणी गोसावी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष भागवत, गिर्यारोहक विलास जोशी यांच्यासह अन्य मान्यवरांनीही आपली उपस्थिती नोंदवली.
कार्यक्रमाचे संयोजन सचिव अजिता मुळे, बालसचिव अजया मुळे, माधुरी भागवत यांच्यासह विविध स्वयंसेवकांनी केले.