
पुणे : शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत 2025-26 प्रवेश प्रक्रियेमध्ये लॉटरीद्वारे निवड होऊनही २६ विद्यार्थ्यांना काही खासगी शाळांनी प्रवेश नाकारला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पालकांनी सुमित जाधव सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा महेश काटे यांच्याकडे धाव घेतली.
या प्रकरणात काटे यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि प्रशासन यांच्याशी चर्चा करून सखोल तपास केला. विद्यमान आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. प्रताप सोमवंशी यांच्या सहकार्याने, योग्य पाठपुरावा करत शाळांना शासन नियमांची आठवण करून देण्यात आली.
या संयुक्त प्रयत्नांमुळे संबंधित शाळांनी आपली भूमिका बदलत २६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दीपा महेश काटे म्हणाल्या, “शिक्षणाचा हक्क कोणालाही नाकारता येत नाही. पालकांच्या तक्रारी गंभीरतेने घेऊन आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलांना न्याय मिळवून दिला.”