
पुणे | 15 एप्रिल 2024: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पिंपरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला लाच मागण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अँटी करप्शन ब्युरो (ACB) पुणे विभागाने ही कारवाई केली.
आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव सतीश तानाजी कोकणे (वय 38) असे असून, तो पिंपरी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याच्यावर एका तक्रारदाराकडून 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या विरोधात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही लाच मागितल्याचे सांगण्यात आले.
ACB च्या अधिकाऱ्यांनी 11 आणि 12 एप्रिल रोजी सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी आरोपीने तडजोडीनंतर 30,000 रुपये स्वीकारले. ही रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपाधीक्षक श्रावण निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीविरोधात भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ACBने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास त्वरित तक्रार करावी. संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक 1064 तसेच वेबसाइट www.acbmaharashtra.gov.in वर संपर्क साधता येईल.