
कागल : कराड येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार आयपीएस बिरदेव डोणे यांनी काढले. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमात बिरदेव डोणे यांनी “नको बुके, नको हार – फक्त वह्या-पुस्तके आणा” असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ट्रस्टने यमगे येथील ५० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप डोणे यांच्या हस्ते केले.
आपल्या भाषणात डोणे म्हणाले, “आजही डोंगरदर्यातील मेंढपाळ समाजातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. बहुजन समाज अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात पूर्णपणे आलेला नाही, हे दुर्दैव आहे. मात्र अशा परिस्थितीत अहिल्यादेवी ट्रस्टने घेतलेली शैक्षणिक चळवळीची दिशा खरोखरच उल्लेखनीय आहे.”
कोरोना काळात ट्रस्टने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड या जिल्ह्यांतील दुर्गम भागात मेंढपाळांच्या मुलांसाठी केलेले कार्यही त्यांनी विशेषपणे अधोरेखित केले.
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे – ते पिल्यानंतरच समाजाचा विकास शक्य आहे. त्यामुळे बहुजन समाजातील अधिकाधिक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत पोहोचावेत, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रवीण काकडे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), बाळासाहेब पुकळे, डॉ. मच्छिंद्र गोरड, प्रा. हेमंत पुकळे, संजय कात्रट, प्रा. स्वाती वाघमोडे, गजानन हुलवान, सतिश थोरात, आकाश हुलवान, अनिल हुलवान, विजय माळकर, योगिता घुले, अमर गोरड, पांडुरंग गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.