
एस एम देशमुख, ज्येष्ठ पत्रकार
साहेब,
गेली काही दिवस आपण बोलतच नाही आहात..
मौनव्रत वगैरे नाही ना?
रोज तुम्हाला ऐकण्याची,
पाहण्याची सवय लागलीय आम्हाला..
पण गेली काही दिवस आपला आवाजही ऐकू येत नाही म्हणून विचारलं..
आपण टीव्हीवर दिसतही नाहीत..
आपणास ऐकण्यासाठी आम्ही बेचैन आहोत..
साहेब, थोडं बोला,
दर्शन द्या एवढंच मागणंय
अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं,
म्हणून बोलणं बंद केलंय का?
तसं असेल तर त्याचं एवढं मनाला लावून घेऊ नका ..?
आपण आता अशा अपमानाची सवय करून घेतली पाहिजे..
त्यांची कारण बघा..
भारतानं तेल कोणाकडून खरेदी करायचं हे ट्रम्प सांगणार,
भारतानं फायटर जेट कोणाकडून खरेदी करायचं याच्या सूचना ट्रम्प करणार,
अमेरिकन मालावर भारतानं किती टेरिफ लावायचा याचा आदेश ट्रम्प देणार,
भारतीय मालावर ट्रम्प टेरिफ वाढविणार अन आपण मात्र मान खाली घालून “जी हुजूर” म्हणत होकारार्थी मान हलविणार..,
भारतीय नागरिकांच्या पायात बेड्या घालून लष्करी विमानानं त्यांना भारतात आणून सोडणार अन आपण सारं गुमाणं सहन करणार..,
भारतानं युध्द कधी करायचं आणि कधी थांबवायचं हे देखील ट्रम्प ठरवणार आपण ब्र न काढता शस्त्रसंधी करणार..
हे यापुढं ही होत राहणारच आहे..
ते मनावर घेऊन आपण बोलायचंच बंद केलं तर कसं चालेल?
नाही करमणार हो आम्हाला..
तेव्हा प्लीज काही तरी बोला सर,
तुमचे शब्द ऐकायला कान अधीर झालेत..
हवं तर बिहारला जाऊन इंग्रजीत बोला ..
तिकडं जाऊन फड जिंकल्याशिवाय विरोधकांनाही 56 इंच छाती काय असते ते कळणार नाही..
त्याशिवाय त्याचं सारखं इंदिरा, इंदिरा करणंही बंद होणार नाही..
साहेब, तुम्हाला समोर येऊन बोलावंच लागेल…