
पुणे : बहुरंग, पुणे आयोजित 18वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सोमवार, दि. 19 आणि मंगळवार, दि. 20 मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. माडीया गोंड लोक शिरस्त्राण म्हणून वापरत असलेले ‘शीरमोर’ हे यंदाच्या महोत्सवाचे बोधचिन्ह आहे, अशी माहिती बहुरंग, पुणेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी आज (दि. 12) पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सव पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे होणार आहे. देश-विदेशातील आदिवासी जमातींची सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, वेगळेपणा, बोलीभाषा, चालीरिती, जीवनशैली, धार्मिक कार्ये, देवदेवता, रूढी-परंपरा तसेच कला, संगीत, नृत्य, नाट्य या विषयी माहिती व्हावी या उद्देशाने दरवर्षी आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. राज्य शासनाअंतर्गत असलेला सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 19 रोजी दुपारी 12 ते 12:30 या वेळात महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून उद्घाटन स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12:30 ते 3 या वेळात ब्लॅक स्टॅम्प (मराठी), ढोल (मराठी), धातू शिल्पकला (मराठी), काठी होळी (मराठी), सोम्या (मराठी), वेलकम टू कचराघर (इंग्रजी), ह्यू (इंग्रजी), पायविहिर (मराठी), कष्टाळू (मराठी) या देश-विदेशातील लघुपटांसह ‘आम्ही आदिवासींची लेकरे’ हे आदिवासी गीत दाखविले जाणार आहे.
दि. 20 रोजी कलावंत, कला पुरस्कार वितरण सोहळा दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. दिनेशकुमार यशवंत भोईर (पालघर) आणि दत्तात्रय हैबत तिटकारे (खेड) यांचा कलावंत पुरस्कार देऊन तर परमानंद हिरामण तिराणिक (वरोरा-चंद्रपूर), आणि कृष्णा सदाशिव भुसारे (विक्रमगड) यांचा कला पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12:30 ते 3 या वेळात भगवान बिरसा मुंडा (हिंदी) चित्रपट दाखविला जाणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.