
जळगाव: जळगाव शहरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
तीन गोळ्या झाडल्याचा प्रकार
शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यामुळे त्यांच्या घरातील काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता तीन रिकामी काडतुसे सापडली. याप्रकरणी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तपासाची जबाबदारी घेतली असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
पोलीस संरक्षणाची घोषणा
शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे AIMIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या घटनेनंतर त्यांचे समर्थक आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक घटनास्थळी उपस्थित राहिले. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून शेख अहमद यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे.
राजकीय तणावाचा संशय
या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, निवडणूक तणावामुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडणे चिंताजनक असून पोलीस तपासानंतरच सत्य समोर येईल.
मतदान आणि निकालावर लक्ष
जळगावसह महाराष्ट्रभर उद्या, 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. अशा घटनांमुळे निवडणूक प्रक्रिया सुरक्षित आणि शांततेत पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.