रत्नागिरी: निवडणुकीत मतदारांना पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून कोकणातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात साळवी यांनी थेट लांजा पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली, ज्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजा तालुक्यातील एका ग्रामीण भागात शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी गणेश लखन हे एका घरात संशयास्पदरीत्या पैसे वाटत असल्याचं गावाच्या पोलीस पाटलांच्या निदर्शनास आलं. यानंतर सरपंच आणि पोलीस पाटील यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर राजन साळवीही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी थेट लांजा पोलीस स्टेशन गाठलं.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 173, 351 (2) आणि मोटार वाहन कायदा कलम 60/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शिवसेनेचे पदाधिकारी गणेश लखन, बाबू खामकर, आणि ओंकार मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार साळवी यांनी चार दिवसांपूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहून विरोधी पक्ष निवडणुकीत पैशांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. यामुळे या प्रकरणामुळे निवडणूक अधिक तापण्याची शक्यता आहे. शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सामंत निवडणुकीच्या मैदानात असल्याने या आरोपांवर राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे.