2004 साली सुशीलकुमार शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून काँग्रेस आघाडी सत्तेत आली. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री अशी ब्रेकिंग न्यूजही चॅनेल्सवर झळकली पण काहीच वेळात फेरबदल होऊन विलासराव देशमुख यांच्या नावाची घोषणा झाली. ‘दो हंसो का जोडा’ म्हणून विलासराव आणि सुशीलकुमार यांची मैत्री प्रसिद्ध होती. सोलापूरची प्रेमाची जकात चुकवल्याशिवाय लातूरला जाता येत नाही म्हणणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंनी उद्विग्न होतं हिरव्या गवतात लपलेले हिरवे साप ओळखता आले नाहीत अशी प्रतिक्रिया दिली होती.
आता पाळी दुसऱ्या शिंदेंची आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला.
याची पावती म्हणून पुन्हा शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून सन्मान मिळेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे तर भाजपला 133 जागा मिळाल्या आहेत .मनाविरुद्ध उपमुख्यमंत्री पद स्वीकाराव्या लागलेल्या देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे अशी मागणी भाजप समर्थकांची आहे.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित न करता निवडणूक लढवली गेली.
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री अशा फॉर्म्युल्याची चर्चा नव्हती मात्र मोदी आणि शहा यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचा मुख्यमंत्री आणि तेही देवेंद्र असतील असे सूचक संकेत प्रचार सभेतून दिले.देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ही घोषणा 2014 साली होती.
2019 ला मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र आता 2024 ला पुन्हा येतात का याची उत्सुकता आहे. मनावर मोठा दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं होतं असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. भाजपनं त्याग केल्याची आठवण करून देत त्यागासाठी तयार रहा असे संकेत शहांनी पण दिले आहेतच.असं झालं तर एकनाथ शिंदेंवर सुशीलकुमार शिंदें प्रमाणे त्याग करण्याची वेळ येईल .शिंदे विलासराव दोस्तीत मिठाचा खडा पडला तशी दरार कदाचित शिंदे फडणवीस मैत्रीत पडणार नाही. शिंदेंच्या आवडीचे समृद्धी मार्गावर सुसाट वाटचाल करता येणारं नगरविकास खाते आणि शिंदेंच्या निवडून आलेल्या सहकाऱ्यांना महत्वाची कॅबिनेट खाती देऊन सन्मान ठेवला जाऊ शकतो. अजित पवारांनी वाद नको म्हणून मुख्यमंत्री पदाच्या विषयाला बगल द्यायची ठरवलं आहे.त्यांनाही उपमुख्यमंत्री पदाचा कंटाळा आलाय .7 व्या वेळी उपमुख्यमंत्री होतात का बघायचं.
भाजपचे एकट्याचे 133 निवडून आले आहेत, शिंदे ,अजित पवार यांच्या पक्षात पाठवलेले धनुष्यबाण, घड्याळ चिन्हावर पाठवलेल्या 19 पैकी पण बहुतांश जण निवडून आलेत शिवाय अपक्ष,बंडखोर पण गळाला लागतील थोडक्यात 145 जादुई आकडा गाठणं भाजपला अजिबात कठीण नाही मात्र 2029 ला शत प्रतिशत भाजप असेल स्वबळावर असेल असं शहांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितलं असल्याने आणि मुंबईसह राज्यातील सगळ्या महा पालिका निवडणूका नजीकच्या काळात होणार असल्याने बार्गेनिंग पॉवर ,युटिलिटी कमी असली तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना संभाळून घेतलं जाईल. महापालिका निवडणूक स्वबळावर अशी घोषणा करणारे अजित पवार ठाम राहतात का हेही बघावे लागेल.
–अद्वैत मेहता, ज्येष्ठ पत्रकार