
पुणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात एका महत्त्वाच्या निर्णयाने केली. येरवड्यातील चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे (वय ५९) या रुग्णासाठी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मंजूर करत, त्यांनी पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली. कुऱ्हाडे यांच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपणाची महागडी शस्त्रक्रिया होणार असून या निर्णयामुळे त्यांच्या उपचारांचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुऱ्हाडे यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, या उपचारांसाठी अंदाजे ३० लाख रुपये खर्च येणार आहे. त्यातील पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येत आहेत, तर उर्वरित २५ लाख रुपये धर्मादाय संस्थांकडून उभारले जातील. त्यांच्या पत्नीने ही मदत मागणारा अर्ज विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी दाखल केला होता, मात्र आचारसंहितेमुळे निर्णय प्रलंबित राहिला होता.
मुख्यमंत्र्यांनी शपथविधीनंतर प्रलंबित असलेल्या वैद्यकीय मदत अर्जांवरही तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अशा अनेक गरजू रुग्णांना लवकरच मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
दरम्यान, नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी ७ आणि ८ डिसेंबर रोजी मुंबईत विशेष अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल, तसेच राज्यपालांचे अभिभाषणही होईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या या पहिल्या निर्णयामुळे गरजू रुग्णांच्या मदतीसाठी त्यांच्या सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला आहे.