
पुणे: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वायसीएम रुग्णालयाच्या कैज्युअल्टी विभागातून आलेल्या एका फोनने संपूर्ण रुग्णालयात खळबळ माजवली. नुकतेच जन्मलेले बाळ, ज्याची नाळसुद्धा कापलेली नव्हती, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले. हे बाळ अनाथावस्थेत सोडले गेले होते.
रुग्णालयात दाखल होताच बाळाच्या अंगावर झालेल्या गंभीर जखमांनी उपस्थित सर्वांना स्तब्ध केले. कमरेचा लचका मोडलेला, अंगभर खरचट्यांचे डाग आणि बाळाचे केविलवाणे रडणे यामुळे सर्वांचे हृदय पिळवटून गेले. तातडीने बाळाला NICU (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये दाखल करण्यात आले.
बालरोग विभागप्रमुख डॉ. दीपाली अंबिके आणि सहकारी प्राध्यापक डॉ. राजेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विनय पाटील, डॉ. तनवीर अहमद ख्वाजा, आणि डॉ. गिरीश बडगुजर यांनी बाळाच्या जखमांवर उपचार सुरू केले. गंभीर जखमांवर सर्जनांच्या मदतीने उपचार सुरू झाले.
परिचारिकांचा बाळाला औषधोपचारांसोबत प्रेमळ स्पर्श
परंतु बाळाला फक्त औषधोपचारांचीच नव्हे, तर प्रेम, आपुलकी आणि काळजीचीही गरज होती. Social worker च्या मदतीने बाळाला डायपर, दूध, आणि आवश्यक वस्तू पुरवण्यात आल्या. परंतु बाळाला माणुसकीचा स्पर्श देण्याचे काम NICU च्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडले.
परिचारिकांनी देखील वेळोवेळी बाळाचे डायपर बदलून त्याला इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेतली. रात्रीच्या वेळात बाळाला अर्धा तास दूध पाजणे आणि त्याचे डेकर काढणे ही जबाबदारी त्यांनी निःस्वार्थपणे निभावली.
कायदेशीर प्रक्रिया आणि पुढील काळजी
पोलिसांनी तपास करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बाळाला एका विश्वासार्ह संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. NICU विभागातील डॉक्टर, परिचारिका, आणि social worker यांच्या माणुसकीच्या नात्याने बाळाचे आयुष्य वाचले.
माणुसकीचे नाते
हे बाळ जेव्हा संस्थेकडे सुपूर्द झाले, तेव्हा ते वायसीएम रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना आपलेसे करून गेले. जन्मतः नसलेली नातीही माणुसकीच्या आधारावर कशी जुळतात, याचा आदर्श उदाहरण वायसीएमच्या NICU ने दाखवले.
डॉ. दीपाली अंबिके, डॉ. राजेश कुलकर्णी, डॉ. विनय पाटील, डॉ. तनवीर अहमद ख्वाजा, डॉ. गिरीश बडगुजर, आणि वायसीएम हॉस्पिटलच्या संपूर्ण NICU टीमने दाखवलेली समर्पण भावना कौतुकास्पद आहे. माणुसकीच्या या नात्याने अनाथ बाळाला नवजीवन दिले.