
पुणे: ख्रिश्चन धर्माचे तत्त्वच प्रेम आहे. हा समाज काळजीप्रधान असून आपसात बंधुभाव तसेच दुर्बल घटकांना मदत करणारा आहे. कन्फेशन बॉक्स ही प्रथा छान असून चौकाचौकात असे बॉक्स असले पाहिजेत. सर्व धर्मांनी हे केले पाहिजे, असे आवाहन ॲड. असीम सरोदे यांनी केले.
अलौकिक परिवार ख्रिसमस विशेषांक २०२४ चे नुकतेच वायएमसीए येथे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी अतिथी संपादक प्रवीण भोसले, संपादक दयानंद ठोंबरे, पा. रॉबिन महाडकर, चंद्रकांत काळे, प्रा. श्यामला बेंजी, विश्वास सावळे, प्रशांत उजगरे व्यासपीठावर उपस्थित होते.
सध्या धर्म शास्त्र न राहता धर्म शस्त्र झाले असून समाज उभारणीचे काम लोकांमध्ये जाऊन करणे तसे सोपे नाही. जीवनाचा उद्देश बदलला आहे. दुसऱ्याच्या खिशातून पैसे काढणे हेच आजचे तत्त्व झाले आहे. येशू ख्रिस्ताने दुसऱ्यांना माफ करायला लावले तसे आम्ही माफ करायला शिकले पाहिजे. तसेच स्वतःच्या प्रार्थनाच या ताकदीच्या असतात असेही ॲड. सरोदे यांनी सांगितले.
प्रवीण भोसले म्हणाले, नवीन लेखकांना प्राधान्य दिल्यामुळे भविष्यकाळात सद्यस्थितीत समाज प्रबोधन करणे शक्य आहे. लिहिण्यामुळे प्रगल्भता वाढते तसेच आपले विचार आपण लेखात उतरवतो त्यामुळे एक दस्तावेज तयार होतो आणि पुढच्या पिढीला तो मार्गदर्शक ठरतो.
विश्वस्त विश्वासू नसल्याने समाजात घोटाळा तसेच बेरोजगारीचे प्रमाण त्यामुळे वाढते. लोक पुढे येत नाहीत. चर्चमधील विश्वस्त दुसऱ्यांना संधी देत नाहीत, तसेच समाजाचा उद्धार साधत नाहीत. तरुणांना संधी द्यावी त्यांच्यात लीडरशिप वाढवावी. तरुणांनी शिक्षण चालू ठेवून व्यवसाय करणे गरजेचे असल्याचे सांगितले. व्यवसाय करताना मनापासून करावा, तोटा झाल्याशिवाय व्यवसायातील त्रुटी लक्षात येत नाहीत यासाठी स्वतःचा अनुभव आणि चिकाटी गरजेची आहे.
सुरुवातीला अनिल गडकरी यांनी बायबलवाचन तर रेव्ह. कांतीलाल लोहाडे यांनी प्रार्थना केली. प्रवीण श्रीसुंदर यांनी नाताळ गाणी सादर केली.
बिशप डॉ. अजित फरांदे, रेव्ह. सुहासिनी फरांदे, रेव्ह. कांतीलाल लोहाडे, रेव्ह. इनामदार, रेव्ह. सॉलोमन ओहोळ, नितीन शिरसाठ, अनिल गडकरी, पा. प्रताप व सुप्रिया कुलकर्णी, संदीप गायकवाड, गायकवाड, प्रा. पराग खंडागळे, मनीष पाटील, मार्या देठे, ॲड. प्रफुल्लचंद्र व स्मिता रणनवरे, प्रदीप बोर्डे, रेव्ह. एरिक म्हस्के, राहुल बोर्डे, नितीन रणभिसे, संजय गायकवाड, नितीन भांबळ, आश्विन वंजारे, नोवेल देठे, प्रदीप विधाते, रत्नाकर खरात, लूथर सिसिल तसेच मान्यवर लेखक, विचारवंत, ख्रिस्ती धर्मगुरू आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मय ठोंबरे यांनी तर सुनीता ठोंबरे यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी बिशप डॉ. अजित फरांदे यांनी प्रार्थना करून आशीर्वाद दिला. कार्यक्रमाचे संयोजन सुधीर पाटील, परिक्षित तेलोरे, प्रवीण मेहेंदळे, मंजूषा लोंढे, आकाश ठोंबरे, रिबेका देठे यांनी केले.