
मुंबई: केज तालुक्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली असून या हत्या प्रकरणातील आरोपींना आजपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोमवार (ता.३०) डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांनी दिली आहे.
परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्या प्रकरणी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निषेध नोंदवीत असतांना सोमनाथ सूर्यवंशी या भिमसैनिकाला पोलीसांनी अमानुषपणे मारहाण केल्यामुळे त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यु झाला. तसेच या विटंबना प्रकरणी शांतता प्रस्थापित करण्याचे काम करणारे आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते विजयदादा वाकोडे यांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन केंद्रीय मंत्री रामदास आठवले परभणी येथील भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व ज्येष्ठ दिवंगत नेते विजय दादा वाकोडे यांच्या कुटुंबाची ३० डिसेंबर रोजी सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती जिल्हा रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.