
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने संस्कार भारती, पश्चिम प्रांताने श्रीमंत योगी 2025 या दैनंदिनी चे प्रकाशन केले आहे.
या दैनंदिनीचे विमोचन व वितरण इतिहासाचे अभ्यासक व तज्ञ श्री. प्रसाद तारे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी शाहीर योगेश लोककला रंगमंच, पुनरुत्थान समरसता गुरूकुल चिंचवड येथे झाले.
सुप्रसिध्द शाहीर योगेश यांनी स्थापन केलेल्या संजिवनी महिला शाहीरी पथकाने छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार व आनंदवनभुवनी या दोन गीतांच्या सादरीकरणाने वातावरण शिवमय व आनंदमय केले.
सध्या समाजात इतिहासातील शिवाजीमहाराजांचा जन्म, विविध प्रसंग, मोहीमा अथवा राज्याभिषेक याबाबत प्रमाणित माहिती देण्याचा संस्कार भारती प्रयत्न करते म्हणून दैनंदिनीचे प्रकाशन केले आहे. त्यासाठी श्री. गो. बं. देगलुरकर, श्री. पांडुरंग बलकवडे, प्र. के. घाणेकर, या सारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन घेतले.
आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखान प्रकरण, पन्हाळगडावरून सुटका अशा विविध प्रसंगी छत्रपतीं शिवाजी महाराजांची वागण्याची, विचार करण्याची पध्दत कशी होती हे सांगतांना इतिहासाचे अभ्यासक व तज्ञ श्री. प्रसाद तारे प्रेक्षकांना तत्कालिन वातावरणात घेऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणवैशिष्ट्यांचा समावेश आपल्या आचरणात आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असे यांनी सांगितले. दैनंदिनीत महाराजांच्या जीवनावरील काही महत्वाच्या प्रसंगांचे नव्याने अप्रतिम चित्रण केल्याचा आनंद श्री. प्रसाद तारे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास पुनरुत्यान समरसता गुरूकुल संचालक पद्मश्री श्री गिरीश काका प्रभुणे, मुंबईचे उपजिल्हाधिकारी श्री. किरण कानडे, संस्कार भारती कलाधरोहर विधा संयोजक ज्यांचा दैंनदिनी संकलन करण्यास सहभाग आहे सौ. विनीता ताई देशपांडे, अध्यक्ष डॉ. पं. नंदकिशोर कपोते, उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर आणि श्री. नरेंद्र आमले, सचिव सौ लीना आढाव हे उपस्थित होते.
साहित्य विधा संयोजक सौ. प्रणिता ताई बोबडे यांनी सूत्रसंचालन केले, व सौ. लीना आढाव यांनी आभार प्रदर्शन केले.