
पुणे , दि.1 जानेवारी: “उत्तम बंडू तुपे यांनी निर्माण केलेले साहित्य हे पुन्हा एकदा नीट समजून घेतले पाहिजे. तसेच त्यांच्या साहित्याचा समरसून आस्वाद घेतला पाहिजे. त्यांचे साहित्य हे मूलगामी व सार्वकालिक आहे.ते भारतीय समाजाची व संस्कृतीची चिकित्सा करून त्याला नवी वाट दाखवणारे आहे.”असे गौरवोदगार मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ धनंजय भिसे यांनी ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या मूळा रोड,खडकी, येथील राहत्या निवासस्थानी उदगार काढले. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांच्या जयंतीच्या औचित्य साधून डॉ. धनंजय भिसे संपादित ” उत्तम बंडू तुपे यांचे साहित्य: एक परिशीलन” या ग्रंथाच्या मुखपृष्ठाचे अनावरण उत्तम बंडू तुपे यांचे चिरंजीव मिलिंद तुपे व प्रतिमा पब्लिकेशनचे प्रमुख दीपक चांदणे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर ग्रंथांमध्ये महाराष्ट्रातील अभ्यासक समीक्षक विचारवंतांनी यामध्ये आपले लेख लिहिले आहेत.