
रामदास तांबे
पुणे: अटल विकास फाऊंडेशन आणि अटल पब्लिकेशनतर्फे आयोजित महाराष्ट्र महाशिष्यवृत्ती परीक्षा 2024 चा शिष्यवृत्ती वितरण सोहळा पंडित भीमसेन जोशी कलामंदिर, औंध येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सरस्वती देवीच्या मूर्तीला आणि दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार विजेते गिरीश प्रभुणे, भाजपा प्रदेश चिटणीस वर्षाताई डहाळे, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग सर, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राज्य महामंत्री विशाल रोहनकर, मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे पाटील, विनोद पाटील, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर विवेक पाटील, तसेच अटल ज्ञानपीठ अध्यक्ष राहुल प्रधान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पूर्वी अशा प्रकारची शिष्यवृत्ती देणारे उपक्रम नव्हते. पालक अतोनात कष्ट करून मुलांना शिक्षण देत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील जाती-धर्मातील लोकांना उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
गुणवत्तेसाठी प्रयत्नशील अटल ज्ञानपीठ
अटल ज्ञानपीठाचे सचिव विशाल वाळुंजकर यांनी परीक्षेचा उद्देश सांगताना म्हटले, “या परीक्षेत 700 विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम, द्वितीय, व तृतीय श्रेणीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल, यावर आमचा विश्वास आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अटल ज्ञानपीठ अध्यक्ष राहुल प्रधान यांनी केले, तर स्वागत सचिव विशाल वाळुंजकर यांनी केले. गौरव वाळुंजकर यांनी आभार प्रदर्शन केले.
उत्साही उपस्थिती
कार्यक्रमात भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष मीनाक्षी गायकवाड, नितीन जाधव, दत्तात्रय गायकवाड, रोहित काटे आणि इतर मान्यवरांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या भविष्याचा मार्ग सुकर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल.