
पुणे: पुणे विमानतळावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी दीपक काटे यांना त्यांच्या बॅगेत पिस्तूल, 28 जिवंत काडतुसे, 7.65 एमएम कॅलिबर आणि दोन मॅगझीन सापडल्याने अटक करण्यात आली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक काटे हे पुण्याहून हैदराबादला एका कार्यक्रमासाठी जात होते. रात्री 10.53 च्या सुमारास सुरक्षा तपासणीदरम्यान विमानतळ अधिकाऱ्यांना त्यांच्या बॅगेतून संशयास्पद साहित्य सापडले. सीआयएसएफला याबाबत कळवण्यात आले, आणि त्यानंतर विमानतळ पोलिसांनी दीपक काटे यांना ताब्यात घेतले.
आरोपीच्या जबाबात फसवणुकीचा आरोप
अटक केल्यानंतर दीपक काटे यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दीपक काटे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत, “आपल्याला फसवण्यासाठी हा कट रचला गेला आहे,” असा दावा केला. त्यांनी स्पष्ट केले की, “मी वारंवार विमान प्रवास करतो आणि सुरक्षा नियमांची मला पूर्ण कल्पना आहे.”
पुढील तपास सुरू
विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप कापरे यांनी सांगितले की, “आरोपीकडे सापडलेल्या शस्त्रास्त्रांची कागदपत्रे तपासली जात असून, यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.” या प्रकरणामुळे भाजपसाठीही नव्या वादाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.