
पुणे: नोकरीवर रुजू होताना तीन अपत्य असल्याची माहिती लपवून ठेवणाऱ्या महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दांगट यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त असलेल्या दांगट यांनी शासनाच्या १ जुलै २००५ च्या परिपत्रकाचे उल्लंघन केले आहे. या परिपत्रकानुसार २८ मार्च २००६ नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा जास्त असल्यास संबंधित उमेदवाराची नेमणूक अयोग्य ठरते. नियुक्तीच्या वेळी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर अपत्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे.
दांगट यांनी नियुक्तीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते. याबाबत तक्रार आल्यानंतर आयुक्तांनी चौकशी केली असता, दांगट यांना तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाले. या चौकशीनंतरही विविध कारणांमुळे कारवाई लांबवण्यात आली होती. मात्र, अखेर महापालिका आयुक्तांनी ठोस पाऊल उचलून दांगट यांना सेवेतून कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे महापालिकेच्या कर्मचारी वर्गामध्ये खळबळ उडाली असून, शासकीय नियमांचे पालन करण्याबाबत कडक संदेश गेला आहे.