
पुणे : धनगर समाज सेवा संघाच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या १७ वा राज्यस्तरीय भव्य वधू-वर मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र, कर्नाटक, आणि मध्यप्रदेशातील धनगर समाजातील इच्छुक वधू-वर, त्यांचे पालक, आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मेळाव्यादरम्यान वधू-वरांनी आपला परिचय देत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. हा मेळावा केवळ विवाहयोग्य युवक-युवतींसाठी नव्हे, तर समाजाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला आहे.
“धनगर समाज सेवा संघाने समाजातील युवक-युवतींसाठी विवाह जुळवण्याचे काम सोपस्कर आणि प्रभावी पद्धतीने केले आहे. या उपक्रमामुळे विवाह प्रक्रियेला एक पारदर्शक आणि सोयीस्कर व्यासपीठ मिळाले आहे,” असे धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद कुचेकर यांनी Reporter Today News शी बोलताना सांगितले.
त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, या मेळाव्याचा उद्देश केवळ विवाह जुळवणे नसून समाजातील एकोपा आणि परस्पर सहकार्य वाढवणे आहे. या कार्यक्रमाच्या यशाबद्दल त्यांनी सर्व सहभागी आणि स्वयंसेवकांचे आभार मानले.
समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम
धनगर समाजातील पालक आणि युवक-युवतींनी या मेळाव्याबद्दल समाधान व्यक्त करत या उपक्रमाला भविष्यातही सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.