
पुणे: पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे भंगार बाबतचे धोरण तयार नसल्याने वडगाव खुर्द मधील लायगुडे दवाखाना कबाडखाना बनला आहे . पुणे मनपाच्या विविध रुग्णालये , प्रसूतिगृह येथील टाकाऊ वस्तू , बेड , उपकरणे आदि गोष्टी सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द मधील कै मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखान्यामध्ये जमा करून ठेवले आहेत .
कै मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखाना हा मुख्यतः प्रसूतिगृह म्हणून प्रसिद्ध आहे, वडगाव , धायरी , नऱ्हे , नांदेड , किरकीट वाडी , सणसवाडी व परिसरातील अनेक नागरिकांकडून या दवाखान्याचा वापर केला जातो आहे. याठिकाणी प्रसूतीपूर्व तपासणीसाठी अनेक महिला येत असतात . अश्यातच ह्या ठिकाणी सर्व दवाखान्यातील टाकाऊ वस्तू जमा केल्या आहेत, त्यामध्ये रानटी गवत उगवणे आणि पावसाचे पाणी साठून विविध उपद्रवी कीटकांची पैदास होत असल्यामुळे नागरिकांच्या बरोबरच, येथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे.
नुकतेच रुपेश राम केसेकर यांच्या तक्रारींनंतर याठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन प्लांट भोवती वाढलेली झाडे , झुडपे व गवत काढण्यात आली आहेत . परंतु पुणे मनपाचे दवाखान्याचे कामकाज बघणाऱ्या आरोग्य विभागाकडे भंगार मटेरिअल बाबत स्क्रॅप पॉलीसी तयार नसल्यामुळे त्याठिकाणी साठवण्यात आलेले भंगार मटेरिअलची विल्हेवाट कशी लावायची , यावर काहीही निर्णय होत नाहीये. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाची असणारे गाईडलाईन , धोरण याचा वापर का केला जात नाही हा देखील प्रश्न निर्माण होत आहे .
हे धोरण बनवण्याची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाच्या डॉ. संजीव वावरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. आरोग्य विभाग प्रमुख डॉ. लीना बोऱ्हाडे यांनी स्क्रॅप पॉलीसी तयार करण्याची प्रक्रिया किती पूर्ण झाली आहे याच लवकरच माहिती घेते असे सांगितले आहे .
चीनी व्हायरसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन स्वतः डॉक्टर असणारे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ राजेंद्र भोसले व राज्य शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य विभाग प्रमुख डॉ. लीना बोऱ्हाडे याप्रकरणी तत्काळ काही पावले उचलणार का ? कि पुन्हा एखादि रोगराई पसरल्या नंतरच पालिकेला जाग येणार आहे.