अद्वैत मेहता
बारामतीत पवार विरुद्ध पवार या महानाट्याचा दुसरा अंक रंगलाय.लोकसभेतील सुनेत्रा पवारांचा पराभव जिव्हारी लागल्यानंतर विधानसभा निवडणूकीचा अर्ज भरेपर्यंत अजित पवार मी बारामतीतून निवडणूक लढवणार नाही हा धोशा लावत राहिले आणि शेवटी बोलतो त्याच्या उलट या काकांच्या वळणावर जात मैदानात उभे राहिले अपेक्षेप्रमाणे युगेंद्रला तिकीट देत काकांनी पुतण्या विरुद्ध काका अशी लढाई खेळायला अजित पवारांना भाग पाडलं.
आपण केलेल्या कामाच्या जोरावर बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार कौल देतील या भ्रमात अजित पवार राहिले पण केवळ बारामतीच नाही तर खडकवासला सारख्या शहरी, भाजप किंवा मोदी यांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघातही सुप्रिया यांना लीड मिळालं जे कांचन कुल,महादेव जानकर उमेदवार असताना मिळालं नव्हतं.सर्व 6 मतदारसंघातून लीड घेत निर्विवाद विजय सुप्रिया यांनी मिळवला आणि शरद पवारच बॉस हे सिद्ध झालं.A फॉर अमेठी B फॉर बारामती ही भाजपची बाराखडी -धुळाक्षरे धुळीत मिळाली.इथं पहिला अंक संपला.बारामतीचा AB फॉर्म(A फॉर अजित B फॉर बारामती ) अजित पवारांकडं असला तरी मूळ 7-12 अजूनही शरद पवारांकडे आहे.
शरद पवारांविरोधात सभेत जाहीर बोललं की बुमरँग होतं हे मोदी-शहा यांना कळत नसावं असं नाही.चंद्रकांत पाटील यांनी पवारांना संपवण्याची केलेली भाषा असो वा खुद्द मोदींनी भटकती आत्मा म्हणणं याचा रिवर्स इम्पॅक्ट होतो हे कळतं पण वळत नाही.काही महिन्यांपूर्वी अमित शहा यांनी पवार हे भ्रष्टाचारी नेत्यांचे सरदार अशी टिपण्णी केली.अशोक चव्हाण, अजित पवारांनवर खुद्द मोदींनी भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप करत दोघांना वॉशिंग मशीनमधून धुवून घेत उपमुख्यमंत्री-अर्थमंत्री ,राज्यसभा खासदार केलं. याशिवाय भाजपच्या लेखी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घराणेशाही आणि भ्रष्टाचारी अशा ढीगभर नेत्यांना भाजपनं आमदार,खासदार ,मंत्री केलंय. अनेक नेत्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना-मुलगा,मुलगी,बायको,भाऊ ..विधानसभा निवडणुकीत तिकीटही दिलीत. यामुळं मोदी शहा घराणेशाही ,भ्रष्टाचाराचच्या मुद्द्यावर कोणत्या तोंडाने बोलणार,बोलले तरी दुटप्पीपणा, ढोंगीपणा ,डबल ढोलकी अंगलट येणार.
अजित पवार लोकसभेच्या पराभावातून काही धडे शिकले असं वाटलं होतं.अशोक पवार,निलेश लंके, विजय शिवतरे ,अमोल कोल्हे वगैरे कसे निवडून येतात बघतो अशी दमबाजीची भाषा टाळताना दिसू लागले.पण कधी कधी मूळ स्वभाव उफाळून येतोच हे इंदापुरात झालेल्या सभेत टांगा घोडा वरून दिसलं पण टांगा पलटी होऊन घोडे फरार होता होते राहिले.बाबांनो मी बदलतोय तुम्ही पण बदला असं कार्यकर्त्यांना सांगताना अधून मधून अजित पवार सांगत पण असतात.स्वभावाला।मुरड घालणं अवघडच.
लोकसभा निवडणूकी वेळी रोहितच्या रडण्याची नक्कल करत साहेब भावनिक करतील पण तुम्ही भुलू नका म्हणणारे अजित पवार नुकतेच स्वतः भावूक झाले,आवंढा गिळत, पाणी पित भाषण केलं, डोळ्यातून पाणी बाहेर न आणण्यात कसे बसे यशस्वी ठरले. एरवी गुगलीवर विकेट काढणारे अष्टपैलू पवार असे फुलटॉस मिळाल्यावर मैदानाबाहेर षटकार मारतात ,संधी सोडत नसतात.अजित पवारांची नक्कल करत भावनितेचा चेंडू भिरकावून दिला.गेल्यावेळी सुनिल शेळके यंदा सुनील टिंगरे यांच्या बाबत दादागिरी टाईप बोलत दादांच्या चेल्याना आपण दादांच्या भाषेत आपणही दम देऊ शकतो हेही त्यांनी दाखवून दिलंय.
दिवंगत
आर.आर आबा हे राष्ट्रवादीचा सुसंस्कृत चेहरा होते,पक्षाची अॅसेट होते.डान्सबार बंदीचा निर्णय असेल,गाडगेबाबा स्वच्छता अभियान असेल आर आर आबा यांची प्रतिमा स्वच्छ होती.राज्यातील जनतेचा आदर,प्रेम त्यांनी मिळवलं होतं. कॅन्सरमुळे आर आर पाटील यांचचं निधन झालं तेव्हा अवघा महाराष्ट्र हळहळला होता.विरोधकांनाही उमदा नेता गमावला याचं दुःख होतं पण आर आर आबा यांच्या बद्दल विश्वास घाताचा आरोप त्यांच्या निधनानंतर 9 वर्षांनी करून आणि स्वतः आर आर यावर खुलासा करायला हयात नसताना करून अजित पवारांनी काय साधलं ? स्वच्छ प्रतिमे सोबत आर आर पाटील यांची विश्वासार्हता ही पण जमेची बाजू होती.या आरोपा नंतर आर आर यांनी चौकशीचे आदेश दिले म्हणजे ते सच्चे होते
याचा अर्थ अजित पवारांनवरच्या आरोपात तथ्यच होतं अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटली तर आश्चर्य नाही.एकीकडे मला गैर खपत नाही म्हणायचं ,माझा कार्यकर्ता चुकला तरी टायर मध्ये घाला म्हणायचं दुसरीकडे चौकशी फाईलवर सही केली म्हणून केसाने गळा कापला म्हणायचं.
अजित पवार किती विसंगत विधाने
करतायत.भावनिक होत फुलटॉस तर दिलाच शिवाय दिवंगत आर आर आबांवर हयात नसताना गंभीर आरोप करत स्वतःच्या चुकीने हिट,विकेट,रनआऊट होतायत किंवा सेल्फ गोल करतायत.
सिंचन घोटाळा असो किंवा बँक घोटाळा अजित पवारांची आरोप पाठ सोडायला तयार नाहीत किंवा पाठ सोडून मानगुटीवर बसायला लागलेत. आर आर आबा,भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केल्याची स्वतः ला मुख्यमंत्री न केल्याची सल, बोच तर आहेच.अश्वतथाम्या प्रमाणे भळभळती जखम घेऊन फिरतायत पण खपली काढल्याने जखम भरत नाही चिघळत जाते.
बारामतीकरांच्या मनाचा थांग पवारांप्रमाणे लागत नाही हे खरं असलं तरी लोकसभेला ताई विधानसभेला दादा अशी मत विभागणी होईल असं वाटत होतं.पवारांनी नवा दादा देतो म्हणत डाव टाकला.आत्तापर्यंत अजित पवारांनी निवडणूका सहजी जिंकल्या,सर्वाधिक लीडने जिंकल्या हे खरं असलं तरी बऱ्याच निवडणूकात समोर उमेदवार कोण हे अजित पवारचं ठरवत होते.यातल्या एका फिक्सिंगचा गौप्यस्फोट अजित पवारांनी पार्थ मावळ लोकसभा निवडणूक लढवणार जाहीर होताच बारामतीत केलेल्या भाषणात डमी उमेदवार समोर बसला असताना त्याच्या हवाल्या नेच केला होता.यंदा मात्र फिक्सिंग नाही.काका विरुद्ध पुतण्या,पवार विरुद्ध पवार,जुना दादाविरुद्ध नवा दादा अशी रंगतदार निवडणूक आहे.बिग बॉस फेम “सूरज” चव्हाण झापुक झापुक एकीकडे दुसरीक पाक पुक रायला लावणारे बिग बॉस शरद”चंद्र” आहेत.
राज ठाकरेंनी उद्धव का राज विचारल्यावर ठाकरे फॅमिली असं बेरकी उत्तर देणारे पवार यांच्या प्रमाणे
सामान्य बारामतीकर पण सुप्रिया का सुनेत्रा यावर पवार फॅमिली म्हणत असले तरी वेळ येताच फॅमिलीतली लाडकी बहीण निवडली.
आता लाडका दादा-लाडका भाऊ यापैकी कोण हे निवडायची वेळ आलीय.
एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची बनलीय.लक्षवेधी-बिग फाईट झालीय.
घड्याळ तेच वेळ नवी का
रामकृष्ण हरी वाजणार तुतारी
कोण बसणार घरी
याचा निकाल लावणारी ही निवडणूक रोमहर्षक होईल.
पुन्हा
अ”जित” “पर्व का नवीन युग- “युगें”द्र ( नरेंद्र,देवेंद्र, शरदचंद्र, युगेंद्र )
फैसले की घडी जवळ येतेय.